News Flash

स्टेडियमवरील निवडणूक ताण हलका

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात विविध खेळांच्या सरावांसाठी खेळाडू येत असतात.

‘दादोजी कोंडदेव’ स्टेडियमसाठी पालिका प्रशासनाचा निर्णय

ठाणे महापालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच शहरातील क्रीडाविश्वाचा मानिबदू मानले जाणारे पूर्वेतील दादोजी कोंडदेव स्टेडियम यापुढे कोणत्याही निवडणुकांच्या कामकाजासाठी दिले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतली आहे. निवडणूक कार्यक्रम अथवा पोलीस बंदोबस्तादरम्यान या स्टेडियममधील प्रेक्षागृहाची जागा महसूल तसेच पोलीस यंत्रणेच्या मागणीनुसार दिली जात होती. या काळात या ठिकाणी सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना विविध प्रकारच्या बंधनांना सामोरे जावे लागत असे. खेळासाठी उभारण्यात आलेले स्टेडियम इतर कामकाजांसाठी देण्याची ही अनेक वर्षांची पद्धत मोडीत काढण्याचा निर्णय जयस्वाल यांनी घेतला असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात विविध खेळांच्या सरावांसाठी खेळाडू येत असतात. या सरावासाठी महापालिकेकडून त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र, निवडणुकांच्या काळात प्रेक्षागृहात निवडणुकांचे कामकाज केले जाते. निवडणूक विभाग तसेच पोलीस यंत्रणेस ही जागा दिली जाते. या कामामुळे दीड ते दोन महिने प्रेक्षागृह खेळाडूच्या सरावासाठी बंद ठेवण्यात येते. याबाबत खेळाडू, प्रशिक्षण तसेच पालकांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जात असे. या पाश्र्वभूमीवर स्टेडियममध्ये यापुढे निवडणूक कामकाजास मज्जाव करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. प्रेक्षागृह निवडणूक कामकाजासाठी देण्यात येऊ नये आणि प्रेक्षागृहातील साहित्य अन्य ठिकाणी हलविण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे. निवडणूक कामकाजामुळे खेळाडूंच्या दैनंदिन सरावामध्ये अडथळा निर्माण होऊ नये तसेच प्रेक्षागृह केवळ खेळाडूंसाठीच उपलब्ध व्हावे या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सण तसेच उत्सवांच्या काळात बंदोबस्तासाठी येणारे पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या तुकडय़ांना दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह वास्तव्यासाठी उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, या कर्मचाऱ्यांकडून त्या ठिकाणी पुरेशी स्वच्छता राखली जात नसल्याच्या तक्रारी खेळाडू करीत आहेत. त्यामुळे या पोलिसांनाही प्रेक्षागृह देण्यात येऊ नये, असा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे. दादोजी स्टेडियममध्ये आगामी काळात रणजी क्रि केट स्पर्धेसाठी खेळपट्टी तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी नियमितपणे रणजी सामने व्हावेत असा प्रशासनाचा मानस आहे. याशिवाय स्टेडियममध्ये नियमितपणे अ‍ॅथलेटिक्सचा सराव करणाऱ्या खेळाडूंना येथील सुविधा सतत उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2018 2:36 am

Web Title: dadaji kondadev stadium thane election work tmc
Next Stories
1 प्राचीन चोरवाटेचा छडा
2 कातकरी जमातीच्या लोकसंख्येत घट
3 बचतगटांतील उत्पादनांना संक्रातीनिमित्त मागणी
Just Now!
X