मध्य रेल्वेची घोषणा; बदलापूर-अंबरनाथ स्थानकांत ‘होम प्लॅटफॉर्म’

वाढत्या लोकसंख्येचा अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकावर वाढता भार पाहता दोन्ही स्थानकांत ‘होम प्लॅटफॉर्म’ची निर्मिती आणि वाढीव लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी ही घोषणा नुकत्याच झालेल्या बैठकीत केली.  दादर-बदलापूर नव्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. दोन्ही स्थानकांवरील गर्दीचा विचार करता होम प्लॅटफॉर्मची निर्मिती, लोकलच्या वाढीव फेऱ्या, अतिरिक्त पादचारी पुल, अंबरनाथ स्थानकात सरकते जिन्यांची मागणी सातत्याने होत होती. या संदर्भात मंगळवारी खासदार शिंदे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्याबरोबर बैठक घेतली.  बैठकीत अंबरनाथ येथे ‘होम प्लॅटफॉर्म’ची मागणी लावून धरली. यावर महाव्यवस्थापकांनी हे काम एमयूटीपी ३ अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. यासाठी आवश्यक निधीसाठी जागतिक बँकेची मंजुरी एक-दोन दिवसांत अपेक्षित आहे. दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे ते म्हणाले.

अंबरनाथ स्थानकातील गर्दी विभाजनासाठी फलाट क्रमांक एकवर होम प्लॅटफॉर्मसह स्थानकाच्या मध्यभागी पादचारी पुलाची मागणीही सातत्याने केली जात होती. त्यामुळे फलाट एक आणि दोनमध्ये नवा सहा मीटर रुंदीचा पूल उभारला जाईल.

नव्या पुलासह अंबरनाथ रेल्वे स्थानकात तीन सरकते जिने लावण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकाची जुनी प्रशासकीय इमारतही दुमजली बांधण्यात येणार आहे.

दोन्ही मार्गावर सोळा फेऱ्या

अंबरनाथ रेल्वे स्थानकातील सोयीसुविधांसह बदलापूरच्या प्रवाशांनाही वाढीव फेऱ्यांचा दिलासा मिळणार आहे.  येत्या एक नोव्हेंबरपासून वाढीव १६ फेऱ्यांचा समावेश करण्यात येणार असून दादर, कुर्ला स्थानकातून सुटणाऱ्य़ा या १६ फेऱ्यांमध्ये बदलापूरसाठी दोन फेऱ्या मिळणार आहेत. यासह दादर- टिटवाळा-दोन, दादर – डोंबिवलीसाठी सहा तर कुर्ला-कल्याणदरम्यान सहा नव्या फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. दिवा स्थानकात कल्याणच्या दिशेला नवा पादचारी पुल बांधण्यासाठीही रेल्वे प्रशासनाने तयार दर्शवली आहे.