दुतर्फा खोदकामांमुळे वाहनचालकांची जोखीम वाढली

डहाणू-चिंचणी सागरी महामार्गालगत दुतर्फा बेसुमार खोदकाम सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी जोखमीचा ठरला आहे.

विविध योजनांच्या वाहिन्या, तसेच गुजरात वायूवाहिनी विविध तारा, जिओ केबल आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तारा टाकण्यासाठी हे खोदकाम करण्यात आले आहे. दरशंभर मीटरवर पक्के चेंबर बांधण्यात आले आहेत. त्यामुळे मार्गावरील वाहतुकीचा उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचे नूतनीकरण करण्यात येत आहे. यात प्राधिकरणाच्या जुन्या वाहिन्या तोडण्यात येत आहेत. यासाठी अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे मार्गालगतची जागा धोक्याची बनली आहे. डहाणू तालुक्यातील २९ गावांसाठी बाडापोखरण प्रादेशिक नळपाणी योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी नव्या वाहिन्या टाकण्यात येत आहेत. चिंचणी मार्गावरील प्रवास चालकांसाठी अत्यंत जोखमीचा बनला आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाल्याचे रहिवासी अजित बारी यांनी सांगितले.

रस्त्याच्या दुतर्फा तसेच छेद वाहिन्या टाकण्यात येत आहेत. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून खोदकामाची परवानगी घेतली होती. त्याप्रमाणे राज्यमार्गावर काही ठिकाणी छेद वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. येत्या चार दिवसांत ते पूर्णपणे सीमेंट भरून पूर्ववत केले जाईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अरुण निर्भवणे यांनी सांगितले.

केवळ मातीचा भराव

बाडापोखरण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या ५५ कोटी रुपयांच्या वाढीव विस्तारित नूतनीकरण योजना पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली. आता ही योजना तातडीने पूर्ण करून दिली जाणार असल्याने वाहिन्या टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील राज्यमार्ग, तसेच जिल्हा परिषदेचे रस्ते आणि काही ग्रामपंचायतीच्या रस्त्यांच्या दुतर्फा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ठेकेदार ‘मेसर्स घुले कन्ट्रक्शन’च्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. यात चिंचणी, धोबीतलाव, वरोर, गोवणे, वाढवण, पळे, डेहणे, साखरे या गावांत छेद वाहिन्या टाकण्यासाठी रात्रीचे मुख्य राजमार्ग खोदण्यात आले आहेत. खोदकामानंतर वाहिन्यांलगतची चर सीमेंटने भरून देणे बंधनकारक आहे. मात्र त्या ठिकाणी मातीचा भराव टाकलेला आहे.