संरक्षक कठडे तुटले; सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुर्लक्ष

डहाणू शहराला जोडणारा बोहलीपाडा खाडीपुलावरील संरक्षक कठडे तुटल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. डहाणू-नाशिक राज्यमार्गावरील या महत्त्वपूर्ण पुलाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुर्लक्ष केले जात आहे.

डहाणू नगर परिषद क्षेत्रातील राज्यमार्गावरील बोहलीपाडा खाडी पुलावरून आजूबाजूच्या ३५ ते ४० गावांतील ग्रामस्थ ये-जा करतात. या गावांना डहाणूस जोडणारा हा एकमेव पूल आहे. मात्र या पुलाची गेल्या पाच वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे कठडे तुटलेले आहेत. या मार्गावर पथदिवेही नसल्याने रात्री अंधारातून प्रवास करावा लागतो. रात्री या कठडेविरहित पुलावरून एखादे वाहन खाडीत कोसळण्याची भीती आहे.

हा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो. या पुलाचे सर्व संरक्षक कठडे ढासळले आहेत. नागरिक दररोज या धोकादायक पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. याबाबत वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही पुलाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

पावसाळ्यात हा पूल अत्यंत धोकादायक बनलेला आहे. आम्ही जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करतो. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र अद्यापही पुलाच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रियेत अडकला आहे, असे स्थानिक ग्रामस्थ सांगतात.

डहाणू-चारोटी राज्यमार्गावरील नादुरुस्त पुलांचे दुरुस्ती प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. त्याला मंजुरी मिळताच तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

– टी .आर. खैरनार, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.