मिठागराचा परिणाम असल्याचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणू नगर परिषदेच्या लोणीपाडा, वडकून, सरावली, मानफोडपाडा येथील मिठागरांच्या विस्तारामुळे नैसर्गिक स्रोत खारे झाल्याने क्षारयुक्त पाण्यामुळे डहाणूकर चिंतेत आहेत. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने मिठागरे बंद करण्याची मागणी रहिवाशी करीत आहेत.

आगवण, वडकून या भागात मिठागरे अस्तित्व टिकवून आहेत. डहाणू नगर परिषदेच्या क्षेत्रात वडकून येथे १०० एकरचे दोन, लोणीपाडा येथे १०० एकरचे दोन, वाणगाव जवळ चंडीगाव येथे १०० एकरचे दोन आणि आसनगाव येथे एक मिठागर आहे. तालुक्यात सुमारे ८ ते १० मिठागरे चालू आहेत. लोणीपाडा, वडकून येथील  कूपनलिका व विहिरींना त्याचा फटका बसला आहे. त्यातील पाणी क्षारयुक्त झाले आहे.

मीठ उत्पादन करताना सुमारे ५० डिग्रीपेक्षा जास्त क्षारतेचे पाणी तापवणीत साठवले जाते. हे पाणी दोन-चार दिवस तापवल्यानंतर कोंडीत सोडतात. तेथे दोन दिवस ठेवले जाते. या काळात पाण्याचे बाष्पीभवन होऊन लालसर मीठ तयार होते. मीठ तयार होण्याच्या या प्रक्रियेत खाऱ्या पाण्याचा निचरा होऊन नैसर्गिक पाण्याचे स्रोत खारे झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्या जागा खालसा करून मत्स्यशेतीसाठी उपलब्ध करण्याची मच्छीमारांची मागणी आहे.

सागरी मासेमारीचे उत्पन्न घटल्याने मच्छीमार हवालदिल झाला आहे. त्यामुळे गोडय़ा आणि खाऱ्या (निमखाऱ्या पाण्यात ) कोलंबी उत्पादन करणे हा पर्याय उपयुक्त व्यवसाय बनला आहे. टायगर वेनामी कोलंबी ही परराज्यात निर्यात होत असल्याने देशाला परदेशी चलन उपलब्ध होते. कोलंबी उत्पादन निमखारे (गोडे व खारे)अशा स्वरूपाच्या पाण्यात होते. मिठागरांची जागा खालसा करून मासेमारीसाठी उपलब्ध कराव्यात, अशी मागणी कोलंबी उत्पादक आणि विक्रेता संघ (नियोजित) चे अध्यक्ष शशिकांत बारी यांनी केली आहे.

मीठ तयार करण्याची पद्धत

मीठ तयार करण्यासाठी समुद्रातील पाणी तापवणीत घेतात. हे पाणी दोन-चार दिवस तापवल्यानंतर कोंडीत सोडतात. हे पाणी कोंडीत दोन दिवस ठेवले जाते. या काळात पाण्याचे बाष्पीभवन होऊन लालसर मीठ तयार होते. त्यानंतर बांबूच्या काठीला लोखंडी दातेरी लावून मीठ हलवले जाते. या प्रक्रियेत मिठाच्या मोठय़ा खडय़ांचे लहान तुकडे होतात. त्यानंतर उरले-सुरलेले पाणी निघून जाण्यासाठी ते कोंडीच्या बांधावर ठेवले जातात. बांधावर खडेदार मीठ तयार होते. याच ठिकाणी मिठाची खरेदी केली जाते. मीठ तयार करण्याच्या प्रक्रियेला साधारणत: ६ ते ७ दिवस लागतात, अशी माहिती येथील मीठ उत्पादकांनी दिली.

ज्या ठिकाणी नियमांचा भंग झाला आहे अशा मिठागरांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पाण्यात क्षारांचे प्रमाण नेमके कशामुळे वाढत आहे. यावर संस्था संशोधन करीत आहेत.

– राहुल सारंगे, तहसीलदार, डहाणू

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahanukars saline water
First published on: 26-09-2018 at 02:37 IST