निर्बंध हटूनही दहीहंडी आयोजनातील आर्थिक चढाओढ कमी

दहीहंडी उत्सवावर गतवर्षी आलेले निर्बंध यंदा बऱ्याचप्रमाणात कमी झाले असले तरी ठाण्यात उत्सवाचा उत्साह कमी असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून कोटीच्या बक्षिसांची लयलूट करणाऱ्या आयोजकांनी यंदा हात आखडता घेतला आहे. त्यामुळे ठाण्यात मोठमोठय़ा दहीहंडय़ा दिमाखात लागणार असल्या तरी, यानिमित्ताने रंगणारी आर्थिक दिखाऊपणाची चढाओढ कमी झाल्याचे चित्र आहे.

दहीहंडी उत्सवानिमीत्त ठाण्यातील राजकीय नेत्यांच्या मंडळांनी उंच आणि मोठय़ा रकमेच्या दंहीहंडय़ा उभारुन गेल्या काही वर्षांत या उत्सवातील उन्माद वाढविला होता. दोन वर्षांपासून न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर, तेथील सुरक्षा व्यवस्थेवर तसेच आवाजाच्या पातळीसंबंधी काही कठोर आदेश काढल्याने आयोजनातील उन्माद काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे. पाचपाखाडी भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत उभारली जाणारी हंडी गेल्यावर्षीपासून आवरती घेण्यात आली आहे. शिवसेना नेत्यांनी उत्सव आयोजनातील स्पर्धा कायम ठेवली असली तरी यंदा मात्र बक्षिसांचे थर कमी केले आहेत.

ठाण्यातील दहीहंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’ने यंदा नऊ थरांसाठी अवघे एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या आयोजकांकडून दरवर्षी १० लाख रुपयांपेक्षा जास्त बक्षिसे ठेवण्यात येत असत. या मंडळाने यंदा प्रो-कबड्डीच्या धर्तीवर दहीहंडी आयोजनाची नवी वाट चोखाळली असली तरी बक्षिसांवर होणारा खर्च मात्र आवरता घेतला आहे.

मनसेचे ११ लाखांचे ‘थर’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाण्यातील नौपाडा भागात जोगेश्वरीतील जय-जवान पथक तब्बल दहा थर लावणार आहे. या हंडीसाठी मनसेच्यावतीने ११ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने येथे हेल्मेट, जॅकेट पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक अविनाश जाधव यांनी दिली.

प्रो-कबड्डीच्या धर्तीवर ‘प्रो-गोविंदा’

आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि स्टार स्पोर्ट्स यांच्यावतीने  वर्तकनगर येथे प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रो- कबड्डीच्या धर्तीवर प्रो- गोविंदा आयोजित करण्यात आली आहे. जो गोंविदा सर्व प्रथम थर लावेल. त्यांना बक्षीस मिळेल. तसेच जी मंडळे दरवर्षी नऊ थर लावतात. त्यांनाच यावर्षी नऊ थर लावण्याची परवानगी येथे देण्यात येणार आहे, अशी माहिती उत्सवाचे आयोजन पुर्वेश सरनाईक यांनी दिली.

टेंभी नाका येथे शिवसेनेच्या वतीने दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. ठाण्यामधून येणाऱ्या प्रत्येक थरांसाठी वेगवेगळे बक्षिस देण्यात येणार आहे. सर्वात जास्त रकमेचे बक्षीस एक लाख रुपये आहे.

– नरेश म्हस्के, शिवसेना नेते