कारवाईच्या भीतीने धास्तावलेल्या मंडळांचे ठाणे पोलिसांना आर्जव

‘साहेब हंडी तरआटपली..गुन्हेही दाखल झाले. तुम्ही काही आम्हाला सोडणार नाही. एक विनंती आहे. अटक करायची असेल तर एक फोन करा. आम्हीच पोलीस ठाण्यात हजर होतो. घरी येऊन  अटक करू नका’.. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचा काला करत गुरुवारी पोलिसांना वाकुल्या दाखवत कायदा मोडणारच या आविर्भावात वावरणाऱ्या ठरावीक दहीहंडी मंडळाचे पदाधिकारी आता चांगलेच वरमले असून केव्हाही अटक होणार या भीतीने पोलिसांपुढे अशा प्रकारे आर्जव करू लागले आहेत.

न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे वळावा यासाठी मुंबई, ठाण्यातील काही राजकीय मंडळांनी गुरुवारी कायदा धाब्यावर बसवत दहीहंडी आयोजनाच्या नावाने मनसोक्त धुडगूस घातला. अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रणीत मंडळे यामध्ये अग्रभागी होती. न्यायालयाच्या आदेशामुळे पाचपाखाडी भागात एका बडय़ा नेत्याने हा शायनिंग उद्योग बंद केला आणि यंदाच्या वर्षी एरवी आक्रमकपणे वावरणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनीही कायदा पाळण्याचे ठरविले. पक्षाच्या मुखपत्रातून कोणतीही भूमिका घेण्यात आली असली तरी ठाण्यातील शिवसेना नेते मात्र हंडी फोडावयास येणाऱ्या पथकांना चारच थर लावा अशी ‘विनंती’ करताना दिसत होते. एकीकडे असा कायद्याचा माहोल असताना दुसरीकडे मात्र काही मंडळांना भलताच चेव चढला होता. कायदा मोडणारच असे विधान रेखाटलेला टीशर्ट परिधान करत काही नेते तर पोलिसांना वाकुल्या दाखवत होते. हे मिरवणे जरा अति होतय हे लक्षात घेता मग ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या नेत्यांना योग्य समजही दिली. एकीकडे गुरुवारी प्रत्यक्ष उत्सवात मुजोरीचे टोक गाठणारे हे नेते आता मात्र भलतेच मवाळ झाल्याचा अनुभव काही पोलीस अधिकाऱ्यांना येऊ लागला आहे. ‘साहेब काहीही करा पण आत टाकायच्या आधी फोन करा. घरी येऊ नका. एका फोनवर हजर होतो’ असे आर्जव करणारे दूरध्वनी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना येऊ लागले आहे. ठाणे पोलिसांनी अशा १६ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मंडळांच्या अध्यक्षांना अटक होणारच अशी चिन्हे आहेत. अधिक कडक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची तयारीही पोलिसांनी सुरू केली आहे. याची चाहूल लागताच काही पदाधिकारी हादरले असून पोलिसांसमवेत घरातून स्वतची शोभा करून घेण्यापेक्षा आपणच हजर व्हावे या विचाराने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंत्या करू लागले आहेत.

पोलीस ठाणे आणि गुन्हा नोंदविण्यात आलेली मंडळे

  • चेंबूर पोलीस ठाणे – कोळी किंग गोविंदा पथक. बालमित्र व्यायाम शाळा, सांताक्रूझ. वीर बजरंग गोविंदा पथक. अष्टविनायक गोविंदा पथक, वडाळा. सूर्योदय क्रीडा मंडळ, वाकोला. बालगोपाळ मित्र मंडळ, अ‍ॅण्टॉप हिल. अभिनव गोविंदा मंडळ, घाटकोपर
  • विक्रोळी पोलीस ठाणे – परेश पारकर मार्केट स्टेशन रोड दहीहंडी आयोजक. सिध्दिविनायक गोविंदा पथक पार्कसाइट.
  • कांजूर मार्ग पोलीस ठाणे – १. देवकर गुरुजी चौक, वीर सावरकर मार्ग. भांडुप येथील मनसे प्रभाग क्र. ११० च्या दहीहंडीचे आयोजक. ओम साई सेवा मंडळ, बोरिवली (पू.). स्वयंभू हनुमान गोविंदा पथक, विक्रोळी.
  • कोलावरी चर्च, कांजूर मार्ग भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित दहीहंडीचे आयोजक. नूतन भिमज्योत क्रीडा मंडळ, घाटकोपर. सद्गुरु मंडळ, पंतनगर.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वॉर्ड क्र. १११ दहीहंडीचे आयोजक. अनिकेत हॉस्पिटल समोर, वीर सावरकर मार्ग – सद्गुरु मंडळ, पंतनगर.
  • मानवसेवा गोविंदा पथक. नरवीर तानाजी क्रीडा मंडळ
  • भांडुप पोलीस ठाणे – १. संभाजी चौक, भांडुप दहीहंडी आयोजक. ब्ल्यू स्टार मित्र मंडळ, भांडुप. उत्साही मित्र मंडळ.
  • अशोक केदारे चौक, भांडुप (प.) दहीहंडीचे आयोजक. सन्मित्र मंडळ, घाटकोपर. आदिवासी मंडळ, अंधेरी (पू.). संदीप जळगावकर मित्र मंडळ, भांडुप. देवदत्त मंडळ, काळाचौकी
  • अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाणे – शिवसेना शाखा क्र. १६६ पदाधिकारी व आयोजक. श्री काळुबाई गोविंदा मंडळ
  • ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे – शिवालय मातुल्य नाका, लोअर परळ दहीहंडी आयोजक. गांधी नगर स्पोर्टस क्लब, वरळी दहीहंडी पथक.
  • घाटकोपर पोलीस ठाणे – सेनेटोरियम लेन, एमजी मार्ग दहीहंडी आयोजक. रायगड चौक गोविंदा पथक, घाटकोपर (पू.)
  • काळाचौकी पोलीस ठाणे – १.शहिद भगतसिंग मैदान, अभ्युदय नगर. मनसे प्रभाग क्र. २०० पदाधिकारी व आयोजक. श्री बंडय़ा मारुती सेवक, शिवडी. गुरुदत्त गोविंदा पथक, प्रतिक्षा नगर. आझाद गोविंदा पथक, शिवडी. गोविंदा पथक, वडाळा (पू.)
  • कुर्ला पोलीस ठाणे – तानाजी चौक, न्यू मिल रोड कुर्ला (प.) दहीहंडी आयोजक. साईछाया गोविंदा पथक.

 

मुंबईतील २९ मंडळांवर गुन्हे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या एकूण २९ दहीहंडी पथकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चेंबूर नाका आणि काळाचौकी, अभ्युदय नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीदरम्यान सर्वाधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सर्व पथकांच्या अध्यक्षांवर गुन्हे दाखल करत दहीहंडी आयोजकांवरही पोलिसांनी इतरांचा जीव धोक्यात घालणे, कायदेभंग करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

दहीहंडी उत्सवादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दहीहंडी पथकांना दिले होते. तरीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चेंबूर नाका आणि काळाचौकी, अभ्युदय नगर येथे आयोजित दहीहंडय़ांमध्ये १० मंडळांनी कायदेभंग केला. उत्सवादरम्यान पोलिसांनी केलेल्या नोंदी आणि चित्रीकरणाचे विश्लेषण केल्यानंतर ज्या मंडळांनी नियमांचा भंग केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण २१ गुन्ह्य़ांची नोंद करण्यात आली असून त्यात २९ गोविंदा पथकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.