रस्त्यांवरील मंडप, बंद मार्गामुळे वाहतुकीचा खोळंबा

दहीहंडी उत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी केलेले वाहतूक बदल वाहनचालक आणि एकूणच ठाणेकरांसाठी डोकेदुखी ठरल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. शिवसेनेने जुन्या ठाण्याच्या मध्यभागी रस्त्यालगत मंडप टाकून हंडी उभारल्याने पोलिसांनी सत्ताधाऱ्यांना मदतीचा हात पुढे करत टेंभीनाका, जांभळी नाका तसेच नौपाडय़ातील भगवती शाळेच्या मैदानाकडे जाणारे सर्वच रस्ते बंद केले. यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. येथील स्थानिक रहिवाशांना घरापर्यंत जाण्यासाठी स्वत:ची ओळख पटवून द्यावी लागत होती. त्यानंतरच त्यांची वाहने सोडली जात होती. त्यामुळे जागोजागी पोलीस आणि रहिवाशांमध्ये वादाचे प्रसंग घडताना दिसत होते.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी आयोजित आलेल्या दहीहंडय़ांमुळे शहरातील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीत मोठे बदल केले होते. कोपरी पूल, तीन हात नाका आणि नितीन कंपनी या प्रमुख चौकांमधून शहरामध्ये येणाऱ्या मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. तसेच या नाक्यांवर गोविंदा पथकाच्या वाहनांना अडवून सेवारस्त्यांवर उभी करण्यात येत होती. त्यामुळे वाहनांमधील गोविंदा पथकांचे जथे शहरात पायी जाताना दिसत होते. या गर्दीमधून स्थानिकांना वाट काढून वाहने हाकावी लागत होती. टेंभीनाका तसेच जांभळीनाका भागात शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवासाठी वाहतूक बदल करण्यात आले होते. या दोन्ही उत्सवांच्या पाश्र्वभूमीवर जांभळी नाक्यापासून जिल्हा रुग्णालयापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या मार्गावरील वाहनांना सिव्हिल हॉस्पिटल, जीपीओ नाका, कोर्ट नाकामार्गे जांभळी नाक्यावरून ठाणे स्थानकाच्या दिशेने सोडण्यात येत होते. या बदलामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांना वळसा घालून घरी जावे लागत होते. टेंभीनाका भागातील नागरिकांना स्थानिक असल्याची ओळख वाहतूक पोलिसांना पटवून द्यावी लागत होती आणि त्यानंतरच ‘बॅरिकेड’ बाजूला करून वाहतूक पोलीस त्यांना मार्ग मोकळा करून देत होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या अडवणुकीला पोलिसांचे पाठबळ लाभल्याचे चित्र दिसत होते.

वाहतूक नियमांची ऐशीतैशी..

ठाणे शहरातील मोठय़ा दहीहंडय़ा फोडण्यासाठी ठाणे तसेच मुंबई शहरातील गोविंदा पथकांचे जथे रस्त्यावरून फिरत होते. गोविंदा पथकाच्या ट्रक तसेच बस अशा वाहनांना महामार्गावर अडवून सेवारस्त्यांवर उभी केली जात होती. असे असले तरी दुचाकीवरील गोविंदा पथकांना मात्र शहरात प्रवेश दिला जात होता. शहरात ठिकठिकाणी एकाच दुचाकीवर तिघे जण प्रवास करताना दिसून येत होते. याशिवाय त्यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. शिटय़ा, पिपाण्या आणि आरडाओरड करत गोविंदा पथकांचा उन्माद सुरू होता. चरई भागात पोलिसांदेखतच सिग्नल तोडून गोविंदा पथकांतील दुचाकींचा ताफा जाताना दिसून आला.

अधिसूचना नसतानाही मार्ग बंद..

दहीहंडी उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक बदलांसंबंधीची अधिसूचना काढली होती. मात्र, या अधिसूचनेत नोंद नसतानाही नौपाडय़ातील छत्रपती संभाजी मार्ग रस्ता बंद करण्यात आला होता. हरिनिवास सर्कल येथून राम मारुती रोडच्या दिशेने जाण्यासाठी अनेक वाहने या मार्गाचा वापर करतात. अचानकपणे हा मार्ग बंद करण्यात आल्यामुळे स्थानिकांचे वाहतूक पोलिसांसोबत वाद होऊ लागले. अखेर पोलिसांनी स्थानिकांना ओळखणारी व्यक्तीच त्या ठिकाणी उभी केली. या संदर्भात नौपाडा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक कवयित्री गावीत यांच्याशी संपर्क साधला असता भगवती शाळेच्या मैदानात मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीसाठी मंडळांचे जथे मोठय़ा संख्येने या मार्गावरून येत होते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी हा मार्ग बंद करण्यात आला, असा खुलासा त्यांनी केला.