मनसेच्यावतीने नौपाडा येथे आयोजित केलेल्या ९ थरांची हंडी फोडण्यासाठी मुंबईमधील जय जवान गोविंदा पथकाने हजेरी लावली आहे. या हंडीसाठी ११ लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलंय. ठाण्यातील दहीहंडी उत्सव हा जागतिक स्तरावर ओळखला जातो. असे असले तरी यंदा ठाण्याच्या दहीहंडीत पूर्वीसारख्या उत्साहाचे चित्र दिसत नाही. गेल्या ४ वर्षांपासून न्यायालयाने दहीहंडीच्या उत्सवाच्या बाबतीत लावलेले अनेक निर्बंध यंदा उठवण्यात आले. त्यानंतर आयोजक आणि गोविंदा पथक यांच्यात उत्साह दिसेल, असे वाटत असताना सकाळपासून आयोजक आणि पथकामधील उत्साह ओसरल्याचे चित्र दिसते. मात्र सकाळपासून दिसणारे ठाण्यातील वातावरण दुपारनंतर बदलणार का? हे पाहणे उत्सुकतेच ठरेल.

ठाण्यातील टेम्बी नाका, जांभळी नाका तसेच वर्तकनगर येथील आयोजकांनी यंदाच्या बक्षीसाची  रक्कम कमी केली आहे. मनसेच्यावतीने नौपाडा येथे आयोजित केलेल्या ९ थरांच्या हंडीसाठी ११ लाखाचं बक्षीस ठेवण्यात आले आहे. ठाण्यातील या ठिकाणची हंडी फोडण्यासाठी मुंबईमधील जय जवान गोविंदा पथकाने हजेरी देखील लावली आहे. हे पथक यंदा किती थर लावणार याबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता आहे. याशिवाय ठाण्यातील स्थानिक तसेच  शहरातील नामवंत गोविंदा पथकांनी हजेरी लावली. यंदाच्या हंडीच्या उत्सवात डीजेवर असणारी बंदी देखील प्रकर्षाने जाणवत आहे.