ठाणे शहरात दहीहंडी उत्सवानिमित्त डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून घडत असतानाच यंदा मात्र पाच वर्षांच्या तुलनेत दहीहंडी उत्सवामध्ये आवाजाच्या पातळीत मोठी घट झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी नोंदविलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

दरवर्षी आवाजाची पातळी सरासरी ९० ते १०० डेसिबल इतकी असते.  यंदा मात्र आवाजाच्या पातळीची सरासरी ७० ते ८० डेसिबल इतकी नोंद झाली. साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आल्यामुळेच आवाजाच्या पातळीत घट झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून उत्सवाच्या ठिकाणी आवाजाची पातळी यंत्राद्वारे मोजून त्याआधारे ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल करण्यात येतात.  त्याचबरोबर ठाण्यातील सामाजिक कार्यकर्तेही अशाच प्रकारे उत्सवाच्या ठिकाणी आवाजाची पातळी यंत्राद्वारे मोजतात. त्यामध्ये दरवर्षी सरासरी ९० ते १०० डेसिबल इतकी आवाजाची नोंद होते. यंदा मात्र आवाजाची पातळी सरासरी ७० ते ८० डेसिबल इतकी होती.  त्यामध्ये गोखले रोड, नौपाडय़ातील भगवती शाळेचे मैदान, वर्तकनगर, हिरानंदानी मेडोज या भागांचा समावेश आहे.

ध्वनिप्रदूषण कायद्याअंतर्गत कारवाई

नौपाडा येथील विष्णुनगर परिसरात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दहीहंडी आयोजित केली होती. या कार्यक्रमात मोठय़ा आवाजात गाणी वाजवली जात होती. त्यामुळे ध्वनी प्रदूषण कायद्याअंतर्गत जाधव यांच्या विरोधात नौपाडा पोलिसांनी कारवाई केली.

गेल्या पाच वर्षांमध्ये यंदा पहिल्यांदाच आवाजाची पातळी कमी  झाली आहे.  साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आल्यामुळेच आवाजाच्या पातळीत घट झाली असावी. त्याचबरोबर यंदा गोविंदा पथके कमी आल्यामुळे जखमींचे प्रमाणही दरवर्षीच्या तुलनेत घटल्याचे दिसून येते.    – डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते

वसई-विरारमध्ये साधेपणाने उत्सव

महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीमुळे वसई-विरारमध्ये यंदा उत्सव साधेपणात साजरा करण्यात आला.  अनेक आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द करून पूरग्रस्तांना ती मदत दिली. ठिकठिकाणी छोटय़ा दहीहंडय़ांचे आयोजन पाहायला मिळाले. मात्र मागील वर्षीसारखा उत्साह दिसून आला नाही. उत्सवादरम्यान किरकोळ अपघात सोडता कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मीरा भाईंदरमध्ये देखील यंदा उत्सवाचा जोर नव्हता. काही आयोजकांच्या सात ते ९ लाख रुपयांच्या बक्षिसांच्या हंडय़ा फोडण्यासाठी मुंबई-ठाण्यातून पथके आली होती.