गुजरातच्या पुरामुळे मडक्यांची आवक घटली; किमतींमध्ये वाढ

मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये आलेल्या पुराचा फटका हा तेथील मडकी उद्योगाला बसला असून यामुळे मडक्यांची ठाणे तसेच इतर उपनगरांमध्ये येणारी आवक घटल्याची माहिती समोर आली आहे. ऐन दहिहंडीच्या सणालाच हा फटका बसला आहे. मडक्यांच्या दरात ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे.

मुंबई, ठाण्यात दहिहंडी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. या काळात छोटय़ा मडक्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते. ही मडकी गुजरातमधून महाराष्ट्रात दरवर्षी कृष्णजन्माष्टमीच्या दोन आठवडे अगोदर दाखल होत असतात. मात्र यंदा ठाणे तसेच इतर उपनगरांमध्ये मडक्यांची गुजरात प्रांतातून येणारी आवक घटल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी ग्राहकांना चढय़ा दराने मडकी विकत घ्यावी लागत आहे. दहीकाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या छोटय़ा मडक्यांची विक्री बाजारात १०० रुपयाने होत होती. मात्र आता त्याच मडक्याची विक्री ही १५० रुपयाने होत आहे. मडक्याच्या आकारानुसार मडक्याची विक्री किंमतही बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नक्षीकाम केलेल्या काही मडक्यांची विक्री पूर्वीपेक्षा २०० ते २५० रुपये अधिक दराने होत आहे. गेल्या वर्षी ठाणे बाजारात कृष्णजन्माष्टमीला तीन हजार मडक्यांची आवक झाली होती. मात्र यंदा या आवक घटली आहे. यंदा ठाणे येथील जांभळी नाका बाजारपेठेत केवळ १२०० मडकी विक्रीसाठी दाखल झाली आहेत.

धारावीमधून येणारी आवक घटली

मुंबईच्या धारावी येथून मुंबई आणि ठाणेसह इतर उपनगरांमध्ये मडकी कृष्णजन्माष्टमीनिमित्त विक्रीसाठी येत असतात. मात्र धारावी येथील अनेक मडकी तयार करणाऱ्या व्यक्तींनी मडकी उद्योग थांबवून इतर नोकरी-व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले आहे. परिणामी या भागात मडकी तयार करणे काही प्रमाणात बंद झाल्यामुळे बाजारात मडक्यांची आवक घटल्याचे मडकी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.

गुजरातमधून महाराष्ट्रात अधिक मडक्यांची आवक होत असते. या वर्षी गुजरातमध्ये झालेल्या पावसामुळे मडकी उत्पादनात घट झाल्याने महाराष्ट्रात मडक्यांची आवक कमी झाली आहे.

– वसीन देवरिया, मडके विक्रेते, ठाणे