महापालिका हद्दीत ९०१ दहीहंडय़ा; सर्वाधिक ३०० दहीहंडय़ा विरारमध्ये

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर र्निबध घातले असले तरी गोविंदा पथकांचा उत्साह कमी झालेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहीहंडय़ांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा वसई-विरार शहरात ९०१ ठिकाणी दहीहंडी लावली जाणार आहेत. त्यात ७३४ खासगी आणि १६७ सार्वजनिक दहीहंडय़ांचा समावेश आहे. सर्वाधिक म्हणजे ३०० दहीहंडय़ा विरार शहरात आयोजित करण्यात आल्या आहेत.

मुंबई, ठाण्याप्रमाणेच दर वर्षी वसई-विरार शहरात दहीहंडीचा उत्सव मोठय़ा प्रमाणावर आयोजित केला जातो. अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना पुढाकार घेऊन दहीहंडी उत्सवाचे आयोजन करीत असतात.  यंदा उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर अनेक र्निबध घातले आहेत. त्यानुसार १८ वर्षांखालील मुलांना बंदी आणि केवळ चार थरांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र वसई-विरारमध्ये त्याचा परिणाम झालेला नाही. वसई-विरार शहरात या वर्षी एकूण ९०१ दहीहंडय़ा लावल्या जाणार असून त्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झालेली आहेत. या ९०१ दहीहंडय़ांमध्ये ७३४ खासगी आणि १६७ सार्वजनिक दहीहंडय़ा आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी एकूण ६३२ खासगी आणि १५३ सार्वजनिक दहीहंडय़ा होत्या. यंदा र्निबधांमुळे अनेक आयोजकांनी माघार घेतली आहे. परंतु तरीही त्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहेत. महिला गोविंदा पथकांची संख्याही उल्लेखनीय आहेत.

५५० पोलिसांचा चोख बंदोबस्त

  • दहीहंडी  उत्सवावर नजर ठेवण्यासाठी ५५० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात १० पोलीस निरीक्षक, १२ साहाय्यक पोलीस निरीक्षक, ३२ पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह ५३२ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
  • दंगल नियंत्रक पथक, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात येणार आहे.
  • गर्दीत छेडछाडीच्या, विनयभंगाच्या घटना घडू नये यासाठी साध्या वेशातील पोलिसांचे पथक तैनात.
  • मद्यपी चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची विशेष तपासणी मोहीम.
  • बीट मार्शल्सची शहरात गस्त ठेवली जाणार आहे. पोलिसांनी यापूर्वीच प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत.

dahi-handi-chart