किशोर कोकणे

बाजारातील निराशाजनक वातावरणामुळे अनेक आयोजकांची माघार; पूरग्रस्तांना मदत करण्याचे निमित्त

गेल्या अनेक महिन्यांपासून होरपळत असलेला बांधकाम आणि वाहन उद्योग, आर्थिक मंदीमुळे बाजारात असलेले निराशाजनक वातावरण, त्यामुळे घटलेले प्रायोजक या आर्थिक कारणांसह उच्च न्यायालयाच्या कठोर नियमावलीमुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांतील दहीहंडी उत्सवाचा उत्साह यंदा मावळला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण येथील जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीमुळे यंदा उत्सव साधेपणाने साजरा करण्याची घोषणा अनेक बडय़ा उत्सव आयोजकांनी केली आहे. मात्र, प्रत्यक्षात यामागे बाजारातील मंदी हेच प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ातील पूरग्रस्त परिस्थितीचे कारण सांगत मुंबईतील दहीहंडी आयोजकांनी महत्त्वाचे उत्सव यंदा रद्द केले आहेत. मुंबईपाठोपाठ ठाणे, कल्याणातील राजकीय आणि अराजकीय आयोजकांनीही यंदा साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने यंदा उत्सवाचा थाट वेगळाच असेल असे आराखडे बांधले जात होते. प्रत्यक्षात मात्र पुराचे कारण पुढे करत बहुतांश आयोजकांनी साधेपणाची कास धरली आहे. उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी आयोजनासंबंधी कठोर नियमांची आखणी केली आहे. त्यामुळे ठाण्यातील बडय़ा आयोजकांनी यापूर्वीच उत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही वर्षांत उत्साहाचे थरही खाली येत असल्याची चर्चा असताना यंदा मंदीने उरल्यासुरल्या उत्साहावरही पाणी फेरले आहे.

ठाणे आणि कल्याण परिसरातील बहुतांश आयोजक हे राजकीय पक्षांशी संबंधित असले तरी आयोजनासाठी प्रायोजकांकडून रक्कम उभी केली जात असते. प्रयोजकांमध्ये बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचा मोठा सहभाग यापूर्वीही दिसून आला आहे. यंदा एकूणच प्रायोजकांची संख्या आटल्याने उत्सव आयोजनासाठी लागणाऱ्या निधीवर मर्यादा आल्या आहेत, अशी माहिती ठाण्यातील एका बडय़ा दहीहंडी उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

पूरग्रस्तांना मदत म्हणून जरी दहीहंडीला साधे स्वरूप प्राप्त झाल्याचा दावा केला जात असला तरी उत्सवावर मंदीचे सावट आहे, असा दावा प्रसिद्ध मंडप व्यावसायिक आणि बडय़ा उत्सवांचे निर्माते संदीप वेंगुर्लेकर यांनी केला. उत्सवात अचानक अवतरलेल्या या ‘साधे’पणाचा फटका कारागिरांपासून कलाकारांपर्यंत सर्वाना बसला आहे, असेही वेंगुर्लेकर यांनी स्पष्ट केले. मंदीचा हा परिणाम असून अनेक कलाकारांना काम मिळत नाही. कार्यक्रमांचे व्यवस्थापन करणाऱ्या अनेक कंपन्या बंद पडत आहेत. येत्या काळात आणखी हाल होण्याची शक्यता असल्याचे एका कलाकाराने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले.

दहीहंडी आयोजक काय करताहेत?

* ठाण्यातील टेंभीनाका येथे टेंभीनाका मित्र मंडळाची दहीहंडी यंदा पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार असून पथकांना बक्षिसांची रक्कम दिली जाणार नाही.

* खासदार राजन विचारे यांच्या वतीने बांधण्यात येणारी दहीहंडी ही कर्करोग रुग्णांसाठी बांधण्यात येणार आहे. या दहीहंडीत पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा केला जाणार आहे.

* आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीने आयोजित दहीहंडीत केवळ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मात्र, या ठिकाणीही बक्षिसे ठेवण्यात आलेली नाहीत.

* आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने यंदाही ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

* भाजपच्या माथाडी कामगार संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वर्षी मोठय़ा रकमेची दहीहंडी आयोजित केली होती. मात्र, या वर्षी या दहीहंडीच्या माध्यमातून ५ लाख ५५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा केला जाईल असे पाटील यांनी सांगितले.

* मनसेच्या वतीने नौपाडा येथे आयोजित केल्या जाणाऱ्या दहीहंडीचे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. मनसेने ९ थरांसाठी ११ लाख रुपये बक्षीस ठेवले होते. मात्र, यातील अर्धी रक्कम ही पूरग्रस्तांना दिली जाणार असल्याचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी स्पष्ट केले.