उंच थरांपेक्षा सलामीला प्राधान्य, मंडळाचे सामाजिक उपक्रम

विविध विषयांवर सामाजिक संदेश देत वसई विरार शहरात दहीहंडीचा सण उत्साहात साजरा झाला. एक हजारांहून अधिक सार्वजनिक दहीहंडय़ा फोडण्यात आल्या. दुपारनंतर खऱ्या अर्थाने दहीहंडीचा सोहळा रंगला.

थरांचे र्निबध हटविल्यांनंतर उंच दहीहंडय़ांची चढाओढ पहायला मिळणार असा कयास बांधला जात होता. त्यात अनेक मंडळे आणि राजकीय पक्षांनी दहीहंडय़ा आयोजित केल्या होत्या. लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके असलेल्या नऊहून अधिक सार्वजनिक दहीहंडय़ा होत्या. अनेक ठिकाणी मोठय़ा रकमेची पारितोषिके होती. मोठय़ा संख्येने गोविंदा पथकेदेखील यामध्ये सामील झाली त्यामध्ये महिलांच्या गोविंदा पथकांचा देखील मोठा सहभाग बघायला मिळाला. आई चंडिका महिला गोविंदा पथकाने बेटी बचावचा नारा देत पाच थरांची सलामी देत मानाच्या दहीहंडय़ा फोडल्या. तसेच अनेक गोविंदा पथकांनी ५, ६ , ७, ८ अशा थरांची सलामी देत सन्मान चिन्हासह हजारों रुपयांची बक्षिसे जिंकली. डीजे, बॅन्जोच्या तालावर थिरकत अनेकांनी मोठय़ा उत्साहात सहभागी होत आनंद लुटला

  चोख बंदोबस्त

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ  नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. वाहतूक पोलिसांनीदेखील वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी तयारी केली होती. पोलीस बंदोबस्तासाठी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ४४ पोलीस अधिकारी, ३०७ कर्मचारी, ३ राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकडय़ा, दंगल नियंत्रक पथक तसेच ३ पोलीस उपअधीक्षक तैनात करण्यात करण्यात आले होते.

मंडळाचे सामाजिक उपक्रम

वसई-विरारमधील अनेक मंडळांनी दहीहंडी उत्सवात सामाजिक उपक्रम केले. विरार पूर्वेच्या आरजे नगर मित्रमंडळाने भारतीय लष्करासाठी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी जमा केलेला निधी वसईतील पुरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. विरार पूर्वेच्या श्रीकृष्ण जन्मोत्सव मित्रमंडळाने भव्यदिव्य दहीहहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. अनेक मराठी सिनेकलावंत त्यात सहभागी झाले होते.

भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या प्रसाद महाडिक यांच्या पत्नी गौरी महाडिक यांचा यावेळी सत्कार करम्ण्यात आला. नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडी आणि रमाकांत वैद्य चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या दहीहंडीत उंच थर नव्हता. मात्र येणाऱ्या गोविदा पथकांनी सलामी दिल्यास त्यांना मानधन देऊन सन्मान करण्यात येत होता.

एक हजार दहीहंडय़ा

सोमवारी वसई, विरार आणि नालासोपारामध्ये १ हजार ३०५ दहीहंडय़ांसाठी थर लावले गेले होते. यात विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक २४ तर खासगी ७८० दहीहंडय़ांचा समावेश होता. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक १४, तर खासगी १३, वसई पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक ८ तर खासगी ५५, माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक १९ तर खासगी ५५, वालीव पोलीस हद्दीत सार्वजनिक १७ तर खासगी ५९, तुळींज पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक २५, तर खासगी ८० तसेच नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक २५ तर खासगी ८० दहीहंडय़ा होत्या.