News Flash

रस्त्यांवर दहीहंडीचा जीवघेणा सराव

दहीहंडी उत्सवात होणाऱ्या गोविंदांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने दहीहंडी खेळासाठी कडक नियमावली लागू केली.

रस्त्यांवर दहीहंडीचा जीवघेणा सराव
(संग्रहित छायाचित्र)

सुरक्षा साधनांचा वापर न करताच थरावर थर

दहीहंडी उत्सवादरम्यान उंच थर रचण्याच्या ईष्र्येपायी गोविंदा खाली पडून जायबंदी होण्याच्या घटनांवर न्यायालयानेही चिंता व्यक्त केली असताना ठाण्यात दहीहंडीच्या आधीच दुर्घटनांचा ‘सराव’ सुरू आहे. येत्या सोमवारी येत असलेल्या गोपाळकाल्याच्या दिवशी थरांचा थरार कमी पडू नये, यासाठी रस्त्यावर सराव करत असलेल्या गोविंदा पथकांकडून सुरक्षा साधनांचा वापरच केला जात नसल्याचे दिसून येत आहे. बालगोविंदांच्या डोक्यावर शिरस्त्राण नसणे, सरावाच्या वेळी आजूबाजूला मॅट नसणे, वयोमर्यादा पाळणे असे कोणतेही नियम गोविंदा पथकाकडून पाळले जात नसल्याने रात्रीच्या वेळी होणारा गोविंदाचा हा थरार जीवघेणा ठरण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

दहीहंडी उत्सवात होणाऱ्या गोविंदांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने दहीहंडी खेळासाठी कडक नियमावली लागू केली. वयाची मर्यादा राखणे, सात थरांचीच मर्यादा ठेवणे, सुरक्षितता बाळगणे यासारखे नियम गोविंदा पथकांसाठी जाहीर करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेसाठी नियम लागू केले असले तरी पथकांकडून नियमांचे उल्लंघन होत होते. न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवत अनेक गोविंदा पथकांनी नियमबाह्य़ आठ ते नऊ थर रचले होते. यंदाही अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या दहीहंडी उत्सवासाठी ठाणे तसेच उपनगरांतील अनेक गोविंदा पाचपाखाडी, काजूवाडी, रामचंद्रनगर, चरई, वागळे इस्टेट, भवानीनगर या भागात सायंकाळी ९ ते रात्री १२ पर्यंत रस्त्यावरच सराव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सरावादरम्यान कमी वयाच्या गोविंदांचाही सहभाग दिसून येतो. शिरस्त्राण न वापरता हे बालगोविंदा सहाव्या-सातव्या थरावर चढत असतात. तसेच सरावाच्या वेळी पथकाच्या बाजूला सुरक्षेसाठी ‘मॅट’ ठेवण्यात येत नाही. रस्त्यावर हा सराव सुरू असल्याने गोविंदा खाली पडल्यास त्यांना जबर दुखापत होण्याची भीती असते. याबाबत धोक्याचा इशारा देऊनही गोविंदा पथक दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

सरावाचे नियम काय?

  • दहीहंडीची उंची २० फुटांपेक्षा जास्त नसावी.
  • थरांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचा सहभाग नसावा.
  • शेवटच्या थरावरचा मुलगा किंवा मुलगी यांचे वय १४ वर्षांखालील नसावे.
  • सरावादरम्यान शेवटच्या थरावरील मुलाने हेल्मेट तसेच हाताला आणि गुडघ्याला संरक्षक कवच लावलेले असावे.
  • सरावाच्या ठिकाणी जमिनीवर ‘मॅट’ टाकलेली असावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 2:26 am

Web Title: dahihandis deadly practice on the streets
Next Stories
1 झाडांच्या बुंध्यांना लोखंडी ‘कवच’
2 श्रावणातील ‘आहारसंहिते’मुळे येऊरमध्ये शांतता
3 पावलोपावली कोंडीचीच वळणे
Just Now!
X