चिखलोली धरणातून पाणीपुरवठा नाहीच; नागरिकांमध्ये संताप

अंबरनाथ : अंबरनाथ शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नियोजन रखडल्यामुळे या धरणातून अंबरनाथ शहराला कोणताही पाणीपुरवठा केला जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे.

अंबरनाथ शहराची तहान भागवण्यासाठी बदलापूर शहरातील बॅरेज बंधारा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शहरातल्याच चिखलोली धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यात स्वत:चे धरण असलेली अंबरनाथ राज्यातली एकमेव नगर परिषद आहे. शहरातल्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी राज्याच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे.

चिखलोली धरणातून शहराच्या पूर्व भागाला ६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या वर्षात या धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. सध्या चिखलोली धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात पाणी साठा असल्याने धरणाच्या उंची वाढवण्याचे काम सध्या बंद आहे. त्यामुळे धरणातील पाणी शहराला पुरवण्याची यंत्रणा सुरू करण्याची आवश्यकता होती. मात्र दोन महिन्यांनंतरही धरणातले पाणी शहरवासीयांना पुरवले जात नसल्याने नागरिकांत संताप आहे.

जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे शहरवासीयांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असून चिखलोली धरणातले पाणी विनावापर पडून आहे. पाणी असूनही त्याचा पुरवठा होत नसल्याने ते तातडीने देण्याची मागणी आम्ही जीवन प्राधिकरणाला केल्याचे मनसेच्या कु णाल भोईर यांनी सांगितले आहे. येत्या १५ दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही भोईर यांनी दिला आहे.  याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता सुरेंद्र दशोरे यांना विचारले असता पाण्याची चाचणी करून लवकरच धरणाचा पाणीपुरवठा केला जाईल असे त्यांनी सांगितले.

पाणी वितरण यंत्रणेचा अभाव

पाण्याची तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अतिरिक्त ६ दशलक्ष घनमीटर पाणी दिले जाते आहे. मात्र हे पाणी घेऊन वितरित करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याची बाब यापूर्वीच समोर आली होती. हे पर्यायी पाणी पुरवल्यास पाण्याचा दाब कमी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पूर्वेतल्या काही भागांमध्ये नागारिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.