ठाण्यासह इतर महापालिकांना संघटित करण्याची तयारी; अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद

आर्थिक मर्यादा, पर्यावरणाचे प्रश्न आणि प्रकल्पग्रस्तांच्या तीव्र विरोधामुळे वर्षांनुवर्षे केवळ कागदावर राहिलेल्या शाई, काळू या बहुचर्चित धरण प्रकल्पांना गती मिळावी यासाठी ठाणे महापालिकेने उशिरा का होईना पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारता यावा आणि पाण्याची आवश्यकता सरकारच्या ध्यानात यावी यासाठी जिल्ह्य़ातील इतर महापालिकांनीही तरतूद करावी, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. येत्या वर्षांच्या अर्थसंकल्पात या धरणांसाठी तब्बल २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या धरणांचा आवाका लक्षात घेता ही तरतूद खूपच कमी असली तरी सरकारवर दबाव वाढविण्यासाठी ती पुरेशी आहे, असा दावा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान केला.

ठाणे शहरातील विविध भागांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठय़ातील असमतोल दूर करण्यासाठी यंदा महापालिकेने पाणी योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेचे पाण्याचे स्वतंत्र स्रोत असताना ठाण्याला अद्याप मालकीचा स्रोत विकसित करता आलेला नाही. येथील निवडणुकांमध्ये यावरून विरोधकांकडून सातत्याने टीका होत असल्याने सत्ताधारी शिवसेनेनेही धरणासाठी यंदा आग्रह धरला आहे. आयुक्त जयस्वाल यांनी पुढील वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना धरण खरेदीसाठी विशेषत्वाने प्रयत्न करणार असल्याचे जाहीर करत जिल्ह्य़ातील इतर महापालिकांची मोट त्यासाठी बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. शासनाने २००५ मध्ये ठाणे शहरासाठी शहापूर तालुक्यातील शाई धरण विकसित करण्यास मान्यता दिली आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत आखला जावा असेही नंतरच्या काळात ठरले. मात्र, प्रकल्पग्रस्तांचा कडवा विरोध आणि पर्यावरणाचे किचकट प्रश्न यामुळे या प्रकल्पास गती मिळू शकलेली नाही. त्यानंतर मुरबाड तालुक्यातील काळू धरणाची उभारणी ठाण्यासाठी केली जावी असा प्रस्तावही पुढे आला. हे दोन्ही प्रकल्प मोठे असून ते कार्यान्वित झाल्यास संपूर्ण जिल्ह्य़ाला पाण्याचा प्रश्न सोडविण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २५ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी पुरेसा नसला तरी जिल्ह्य़ातील इतर महापालिकांची मोट बांधत त्यासाठी संघटित प्रयत्न केले जातील, असा दावा जयस्वाल यांनी केला. मीरा-भाईंदर, स्टेम, भिवंडी यांसारख्या महापालिका प्रशासनाच्या प्रमुखांसोबत यासंबंधी प्राथमिक चर्चा झाली असून अर्थसंकल्पात या धरणांसाठी तरतूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या महापालिका या धरणासाठी आग्रह धरत असतील तर शासनाला यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, असेही जयस्वाल यांनी या वेळी स्पष्ट केले.

पाणीवितरण व्यवस्थेचे पुनर्नियोजन

दरम्यान, ठाणे शहरात २४ तास पाणीपुरवठा करता यावा यासाठी संपूर्ण शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेचे पुनर्नियोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ७९३ किलोमीटर लांबीची पाणी वहन व्यवस्था, तसेच ६८ दशलक्ष लिटर क्षमतेचे ४४ जलकुंभ उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहेत. हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहेत.

dam-chart

पालिका आयुक्तांचे ५ वर्षांचे व्हिजन

  • विकास आराखडय़ाची अंमलबजावणी
  • रस्ते विकास व वाहतूक सुधारणेवर भर
  • महापालिका इमारतीचा विकास व सुधारणा
  • समूह विकास योजना (क्लस्टर डेव्हलपमेंट)
  • चौपाटी विकास
  • करमणूक व इतर सुविधांचा विकास
  • महापालिकेचे स्वत:चे धरण
  • २४ तास पाणीपुरवठा योजना
  • स्मार्ट मीटरिंग
  • घोडबंदर व दिवा भागात भुयारी गटार योजना
  • सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर
  • एकात्मिक नाले विकास
  • घनकचरा व्यवस्थापन
  • प्रदूषण नियंत्रण
  • आरोग्य सेवेमध्ये सुधारणा
  • शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल
  • विद्युतीकरणावर भर
  • उद्यान विकास
  • महिला व बालकल्याण कार्यक्रम
  • दिव्यांगांसाठी विविध योजना
  • कर्णबधिर मुलांवर उपचार
  • क्रीडा धोरणाची अंमलबजावणी
  • तलाव संवर्धन व सुशोभीकरण