जीर्ण वास्तूंपुढे ‘शरद दर्शन’ चे अनोखे उदाहरण

मालक आणि भाडेकरू यांनी परस्पर सामंजस्य दाखवून योग्य वेळी सहमतीने इमारतीच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला तर धोकादायक अवस्थेतून सुखरूप बाहेर पडता येते, हे ठाण्यातील नौपाडा परिसरातील शरद दर्शन या चाळीने दाखवून दिले आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात धोकादायक इमारतींच्या यादीत असलेल्या या दोन मजली चाळीने कायदेशीर मार्गाने जात दुरुस्तीचे काम पूर्ण करून बांधकामाचे आयुष्य किमान पाच वर्षांनी वाढविले आहे. शहरातील अशा प्रकारच्या इतर काही अधिकृत धोकादायक इमारतींनीही ‘शरद दर्शन’चा आदर्श घेत मालक-भाडेकरू सहकार्याने इमारतीच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात अधिकृत धोकादायक इमारतींची संख्या हजाराहून अधिक आहे. अपुरे चटईक्षेत्र आणि भाडेकरूंचा हक्क हे व्यावहारिक गणित जुळत नसल्याने या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नौपाडय़ातील कृष्णनिवास ही धोकादायक इमारत पडली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने परिसरातील सर्व धोकादायक इमारतींना नोटिसा जारी केल्या. त्यात ‘शरद दर्शन’ इमारतीचाही समावेश होता. १७ खोल्या असणाऱ्या या इमारतीत सध्या आठ कुटुंबे राहतात. घराच्या हक्कावरून बहुतेक ठिकाणी मालक-भाडेकरू वाद असले तरी शरद दर्शन मात्र त्याला अपवाद आहे. नोटीस आल्यावर येथील भाडेकरूंनी मालक शरद लोहकरे यांच्याशी संपर्क साधून सहकारी तत्त्वावर इमारतीची दुरुस्ती करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर ‘शरद दर्शन’वासीयांनी महापालिका प्रशासनाकडून रीतसर स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. त्यात सुचविल्याप्रमाणे इमारतीच्या दुरुस्तीचा आराखडा महापालिकेच्या पॅनेलवरील वास्तुविशारदाकडून करवून घेतला. अवघ्या अडीच महिन्यांत नवे रूप घेऊन शरद दर्शन आता आणखी काही पावसाळे समर्थपणे झेलायला सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्यावर तिथे न राहणाऱ्या काही भाडेकरूंनी आपणहून घराचा ताबा सोडला आहे. दुरुस्तीप्रमाणेच इमारतीचा पुनर्विकासही सहकारी तत्त्वावर करण्याचा निर्धार शरद दर्शनवासीयांनी केला आहे.

दुरुस्ती अशी केली 

गेल्या पाच दशकांत इमारतीचे पिलर्स कमकुवत झाले होते. त्यामुळे मायक्रो काँक्रीटीकरण करून त्याला मजबुती देण्यात आली. खिडक्या, दरवाजांवरील काँक्रीटच्या सज्ज्यांमुळे इमारतींवर भार येत होता. ते  काढून त्याजागी हलक्या वजनाचे पत्रे बसवले. छतावरून होणाऱ्या पाणीगळतीचा बंदोबस्त करण्यात आला. इमारतीला रंगरंगोटी करण्यात आल्याची माहिती वास्तुविशारद अनिल पाटणकर यांनी दिला आहे.

इतर शंभर उत्सुक

दुरुस्तीचा हा ‘शरद दर्शन पॅटर्न’ शहरातील इतर अधिकृत धोकादायक इमारतींनीही स्वीकारावा म्हणून कल्पना चितळे, शिल्पा शृंगारपुरे, मंगल माणकीकर आणि नंदिनी शेरे आदींनी जवळपास पाच-सहाशे इमारतींना भेटी दिल्या. त्यातील शंभरेएक इमारतींनी अशा प्रकारे इमारतीची दुरुस्ती करून घेण्यास उत्सुकता दाखवली. त्यामुळे लवकरच  एक मेळावा आयोजित करून त्यात त्यांना मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती शरद दर्शनचे मालक शरद  लोहकरे यांनी दिली.