काशि-मीरा भागात मांडवीपाडा परिसरातील सेंट झेवियर शाळेबाहेरील रस्त्यावर गॅस सिलिंडरचे  गोदाम तयार करण्यात आले आहे. ते उघडय़ावर ठेवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांच्या  जिवाला धोका निर्माण झाला आहे.

काशि-मीरा भागात मांडवी पाडा परिसरात असलेल्या सेंट झेवियर  शाळेबाहेरील रस्त्यावरच भारत गॅस कंपनीचे गॅस सिलिंडर ठेवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांना या विषयी माहिती असतानादेखील आजवर कारवाई करण्यात आली नसल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे. मोकळ्या रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या या सिलिंडरमुळे कोणत्याही क्षणी अपघात होऊन स्फोट होण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिसरातून मोठय़ा संख्येने नागरिकांची रहदारी सुरू असते. शिवाय या सिलिंडर गोदामाच्या बाजूलाच विद्युत बॉक्स असल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन अपघात झाल्यास तो अधिक घातक ठरणार आहे.

मीरा-भाईंदर शहरात अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे सिलेंडर मोकळ्या परिसरात ठेवण्याचे प्रकार याआधीदेखील झाले आहेत. काशि-मीरा परिसरातील प्रभाग अधिकाऱ्यांनी याची माहिती असतानाही याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहेत.  दरम्यान महापालिका आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी सदर गोदामावर कारवाईचे आदेश दिले आहेत.