भगवान मंडलिक

साधारण दहा वर्षांपूर्वी शिळ-कल्याण रस्ता सुसाट वाहतुकीसाठी ओळखला जात असे. आज अनेकांना या रस्त्यावरून प्रवास नकोसा वाटू लागला आहे. मध्य रेल्वेच्या असह्य़ गर्दीला कंटाळलेले चाकरमानी स्वत:च्या वाहनाने मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने निघताना जागोजागी कोंडीत सापडू लागले आहेत. पादचाऱ्यांना या भागातून रस्ता ओलांडणेही जिकिरीचे होऊ लागले आहे. स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणारे सत्ताधारी आणि प्रशासन कागदावर मोठे प्रकल्प आखण्यात मग्न असले तरी अनेक निष्पापांचे मात्र या नियोजनशून्यतेमुळे बळी जात आहेत.

गेल्या वर्षांत विकास आराखडय़ातील रस्ते भूमाफियांनी टोलेजंग इमारती बांधून बंदिस्त करण्याचा धडाका लावला आहे. भिवंडी ग्रामीणमधील ६० हजार बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सव्वा लाख नवीन बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. वाढत्या वस्तीची ये-जा करण्याची समस्या सोडविण्याऐवजी प्रशासन यंत्रणांचा आंधळेपणा रस्ते वाहतुकीची समस्या वाढण्यास अधिक हातभार लावत आहे. कल्याण-शिळफाटा रस्ता कल्याण डोंबिवली पालिकेची लोकसंख्या, चाकरमानी, तेथील वाहने, परिसरातील वाहनांसाठी ये-जा करण्यासाठी सुयोग्य होता. बाहेरील मालवाहू वाहने, स्थानिक वाहनांची ये-जा करण्याची क्षमता असणारा हा रस्ता आता वाढत्या वाहन संख्येने कोलमडून पडला आहे. या कोंडीच्या फटक्यात निष्पाप जान्हवी मोरे सारखे पादचारी हकनाक बळी जाऊ लागले आहेत. एक प्रसिद्ध कॅरमपटूचा शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकात दुर्दैवी मृत्यू झाला म्हणून प्रशासकीय यंत्रणांना उपाय योजनांचे पान्हे फुटले. असे कितीतरी सामान्य दुचाकी स्वार, पादचारी याच रस्त्यावर कोंडी, घाईमुळे नैसर्गिक मृत्यूच्या नावाखाली बळी जात आहेत, याचे सोयरसूतक कोणालाही नाही.

वाहतूक नियोजनासाठी जेमतेम पोलीस, प्रशासकीय कामात अडकून बसलेले ‘आरटीओ’ अधिकारी त्यामुळे या भागातील वाहतुकीचा विचका झाला आहे. सुटसुटीत वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेला कल्याण-शिळफाटा रस्ता वाहतूक कोंडीने अलीकडे बदनाम झाला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोकवस्तीच्या धनाढय़ विकासकांच्या नवीन वसाहती उभ्या राहू लागल्या आहेत. आतापर्यंत मोकळाढोकळा दिसणारा शिळफाटा रस्ता गगनचुंबी इमारतींच्या वेढय़ात अडकून गेला आहे. मुंबईतील घुसमटीला कंटाळलेला बहुतांशी व्यापारी, कार्पोरेट वर्ग या भागात निवासासाठी आला आहे. वाहनाशिवाय पान न हलणाऱ्या या वर्गाकडे घराघरात दोन ते तीन वाहने आहेत. ही वाहने मोठय़ा संख्येने एकाच वेळी शिळफाटा, कल्याण डोंबिवली, बदलापूर, शिळफाटा-मुंब्रा-पनवेल-नवी मुंबई मार्गावर येत असल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडीत या भागातील रस्ते अडकून पडत आहेत. धनाढय़ विकासकांचे बांधकामांचे आराखडे मंजूर करताना त्यांना पर्यायी रस्ते, स्मशानभूमी, झाडे लावणे, वसाहतींसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अटी घातल्या आहेत. यामधील एकाही अटींचे पालन या विकासकांनी केले नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याचे चटके मूळ निवासी शहरवासीयांना बसू लागले आहेत. या धनाढय़ विकासकांना जाब विचारला तर खुर्चीवर गदा अशी अधिकाऱ्यांची भीती. राजकारण्यांनी ‘आवाज’ केला तर निवडणूक निधी मिळण्याचा प्रश्न? या दुहेरी कोंडीमुळे शिळफाटा रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस गहन होत आहे.

पलावा चौक नव्हे मृत्यूचा सापळा

पलावा चौक, शिळफाटा दत्तमंदिर चौक येण्यापूर्वी वाहनचालकांना कापरे भरते. या भागातील सततच्या कोंडीमुळे अनेक वाहनचालक, चाकरमानी चिंतारोगाने पछाडत चालले आहेत. लोकलच्या गर्दीत शिरता येत नाही म्हणून मुंबई, नवी मुंबई परिसरात नोकरी करणारे कल्याण, बदलापूर परिसरातील चाकरमानी एकत्र येऊन खासगी वाहन करून नोकरीचे ठिकाण गाठतात. अनेक जण दुचाकीने नोकरी ठिकाणचा प्रवास करतात. ही लोकल प्रवासाची गर्दी या रस्त्यावर वाढू लागली आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील काही रस्ते ‘एमएसआरडीसी’, ‘एमएमआरडीए’, सार्वजनिक बांधकाम यांच्या नियंत्रणाखाली आहेत. या यंत्रणांचा एकमेकांशी नसलेला समन्वय हेही रस्ते अपघाताचे मुख्य कारण आहे. या यंत्रणांनी वेळोवेळी आपल्या रस्त्यांची देखभाल केली, पालिकेने आपल्या हद्दीतील विकास आराखडय़ातील रस्त्यांची बांधणी केली तर चालकांना पर्यायी रस्ते उपलब्ध होतील. वाहतुकीचे विभाजन होऊन मुख्य रस्त्यांवरील कोंडी कमी होऊ शकेल. पण पालिका हद्दीतील विकास आराखडय़ातील बहुतांशी रस्ते अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे भूमाफियांच्या घशात जात आहेत. पालिका हद्दीत सव्वा लाख नवीन बेकायदा बांधकामे उभी राहिलीत. या वाढत्या वस्तीचा बेकायदा भार या शहरांतील सुविधांवर पडत आहे.

विकास प्रकल्प कागदावरच

शिळफाटा दत्तमंदिर-काटई-भोपर-उल्हास खाडी ते भिवंडी बायपास, दुर्गाडी-खाडी-कचोरे-डोंबिवली एमआयडीसी-नंदी पॅलेस हॉटेल, भिवंडी बायपास ते शिळफाटा उन्नत मार्ग, भांडुप-ऐरोली ते काटई नाका, काटई नाका ते बदलापूर, बदलापूर ते नाशिक महामार्ग असे महत्त्वाचे रस्ते ‘एमएमआरडीए’च्या भविष्यवेध प्रकल्पांत आहेत. यामधील काही रस्त्यांच्या घोषणा झाल्या आहेत. निविदा काढण्यात आल्या आहेत. असे असताना कामे मात्र सुरू होताना कारभार मंदगतीचा आहे. मार्च २०१९ ला डोंबिवली खाडीवरील माणकोली उड्डाणपूल बांधून पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होणे आवश्यक होते. या पुलाचे आणि लगतच्या पोहच रस्त्यांचे भिजत घोंगडे पडले आहे. दुर्गाडी नवीन पुलाचे कामही असेच अर्धवट आहे. भिवंडी महामार्गावरील नवीन पुलांचे सांगाडे दोन ते तीन वर्षांपासून पडून आहेत. तीन महिन्यांत उभा राहणारा नवीन पत्रीपूल सहा महिने उलटले तरी तेथे एक दगड रचण्यात आलेला नाही. कल्याणमध्ये शिवाजी चौक, लालचौकी, सहजानंद चौक भागांत पादचारी पुलांची आवश्यकता आहे. कल्याणचा रिंगरूट भूसंपादनात अडकला आहे. शिळफाटा, भिवंडी बायपास, काटई-बदलापूर या महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या बाजूला सरकारी जागा वाहतुकीला अडथळा होईल अशारीतीने अडवून फर्निचर, भंगार बाजार उभे केले जात आहेत. यामधून लाखोंचा मलिदा स्थानिक अधिकारी उकळत आहेत. रहिवाशांना सुटसुटीत, सुलभ प्रवास करता यावा म्हणून सुविधा देणे आणि प्रयत्न करण्याऐवजी रस्ते कामाशी संबंधित सर्वच प्रशासकीय यंत्रणा ढिसाळ आणि बेशिस्तीने काम करीत आहेत. त्याचे चटके जान्हवीसारख्या निष्पाप जिवांना बसत आहेत.