बदलापूर पूर्व आणि पश्चिम विभागांना जोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गाची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती झाली आहे. निर्मितीपासूनच त्रासदायक ठरत असलेल्या या भुयारी मार्गात आता वाहने अडकू लागल्याने हा मार्ग धोकादायक होतो आहे. नुकतेच एक कुटुंब येथे स्कॉर्पिओ गाडीत अडकून पडले, मात्र सुदैवाने एका दक्ष नागरिकाने त्यांना तातडीने सुखरूप बाहेर काढले.

बदलापुरात निर्मितीपासून वादग्रस्त आणि त्रासदायक ठरलेला बेलवली परिसरातील भुयारी मार्ग आता धोकादायक बनत चालला आहे. पावसाळ्यात येथे मोठय़ा प्रमाणावर पाणी साचत असल्याने येथून वाहने जाणे अशक्य होत आहे. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहने येथे अडकत असल्याने प्रवाशांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास उल्हासनगरहून आलेले सी. बी. थॉमस, त्यांची पत्नी व दोन लहान मुली स्कॉर्पिओ गाडीतून जात असताना बेलवली येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या पाण्यात अडकले. हा प्रकार समजल्यानंतर कात्रप भागात राहणारे मनोहर ठोके यांनी तात्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानुसार कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्कॉर्पिओमध्ये अडकलेल्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले. सकाळी ही घटना घडल्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास एक टेम्पोही या भुयारी मार्गातील पाण्यात अडकला होता.

कात्रप व बेलवली भागाला जोडणारा हा भुयारी मार्ग सर्वात कमी अंतराचा मार्ग असल्याने अनेक वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. परंतु पाणी साचून राहत असल्याने पावसाळ्यात हा मार्ग नागरिकांच्या उपयोगाचा होत नाही. किंबहुना पावसाळ्यात या मार्गात चार ते पाच फुटाहून अधिक पाणी साचत असल्याने हा मार्ग प्रवासासाठी धोकादायक ठरतो आहे. स्थानिक नागरिक पावसाळ्यात या मार्गाचा वापर टाळतात. परंतु हा मार्ग धोकादायक असल्याबाबत कोणताही सूचनाफलक नसल्याने वा मार्ग बंद न करण्यात आल्यामुळे आतापर्यंत अनेक वाहन चालक या भुयारी मार्गातील पाण्यात अडकले आहेत. त्यानंतरही रेल्वे प्रशासन वा नगर परिषद प्रशासनाकडून असे अपघात टाळण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत याबद्दल नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

डागडूजीचे काय झाले?

तुंबणाऱ्या भुयारी मार्गाबाबत ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर रेल्वेच्या वतीने येथे डागडुजीचे काम करण्यात आले. या वेळी नाल्याची पातळी आणि भुयारी मार्गाची पातळी यात साधारणत: दीड फुटाचे अंतर राखण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यात येथे पाण्याचा निचरा होऊन ते तुंबणार नाही, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र जून महिन्यातल्या पहिल्या पावसातच येथे पाण्याची पातळी वाढल्याने गेल्या तीन महिन्यांपासून हा भुयारी मार्ग धोकादायक बनत चालला आहे. त्यामुळे रेल्वेने केलेल्या डागडुजीचे काय झाले, असा सवालही उपस्थित होतो आहे.