भेंडीबाजारातील दुर्घटनेनंतर महापालिकेचा निर्णय

सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारमधील धोकादायक असलेल्या शेकडो इमारती अधिक कमकुवत झाल्याचा अंदाज महापालिकेने वर्तवला असून शहरातील सर्व धोकादायक इमारतींची फेरतपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मुंबईत भेंडीबाजार येथील अल हुसेनी इमारत दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मात्र शहरात संक्रमण शिबिरे नसल्याने या रहिवाशांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करण्यात येते. त्यांची स्थिती पाहून धोकादायक इमारतींची वर्गवारी केली जाते. सर्वाधिक धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तात्काळ इमारतींमधून बाहेर काढण्यात येते. २०१६ मध्ये शहरात २९२ धोकादायक इमारती होत्या. त्यातील १५० इमारती या अतिधोकादायक आहेत. यंदाही पालिकेने धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले असून त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप या रहिवाशांनी घरे खाली केलेली नाहीत. पावसाळ्यात कुठलीही दुर्घटना घडली नाही, परंतु २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धोकादायक इमारतींना धक्का बसलेला असून त्या पूर्वीपेक्षा अधिक कमकुवत झाल्या आहे. भेंडीबाजारात अल हुसैनी इमारत कोसळून मोठी जीवितहानी झाली होती, तशीच दुर्घटना शहरात घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर आयुक्त सतीश लोखंडे यांनी सर्व धोकादायक इमारतींची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश सर्व प्रभागांतील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. मुसळधार पावसानंतर या इमारतींची स्थिती काय आहे ते यामुळे समजू शकेल, असे आयुक्तांनी सांगितले.

संक्रमण शिबिरे नाहीत

वसई-विरार शहरात संक्रमण शिबिरे नाहीत. त्यामुळे या धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढले तर त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न आहे. शहरातील धोकादायक इमारतीमधील रहिवाशांनी त्यांची व्यवस्था स्वत:हून करायची असते. तशी तरतूद असल्याचे आयुक्तांनी सांगितले. संक्रमण शिबिरे ही पालिकेच्या इमारतींसाठी असतात, खासगी इमारतींसाठी नसतात असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही यापूर्वी सर्व धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. ज्या अतिधोकादायक इमारती आहेत, त्यातील रहिवाशांना तात्काळ घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहे आणि तशी सूचना स्थानिक पोलिसांनाही दिली आहे.  सतीश लोखंडे, आयुक्त, महापालिका