ठाकुर्ली येथील मातृकृपा इमारत कोसळल्याची दुर्घटना ताजी असताना अंबरनाथमध्ये एका धोकादायक इमारतीच्या स्वच्छतागृहाचा स्लॅब कोसळून एक १७ वर्षीय तरुण जखमी झाला. विशेष म्हणजे, या इमारतीमध्ये नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. या दुर्घटनेची तीव्रता कमी असली तरी, या निमित्ताने शहरातील ७३ धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अंबरनाथ नगरपालिका परिसरातच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची ही निवासी इमारत आहे. नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली असली असली, तरी अजूनही या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहे. आपतकालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाचे जवान तातडीने उपलब्ध व्हावेत यासाठी त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था नगरपालिका इमारतीच्या आवारातच करण्यात आली आहे. या इमारतीत नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कुटुंब, शासकीय कार्यालये तसेच आठ व्यापारी गाळे आहेत. या इमारतीत राहणारे वैजनाथ सूर्यवंशी यांचा १७ वर्षांचा मुलगा स्वच्छतागृहात गेला असता तेथील स्लॅबचा भाग अंगावर कोसळल्याने तो जखमी झाला आहे. जखमी मुलास नगरपालिकेच्या छाया रुग्णालयात व नंतर पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न
अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील चाळी, बैठी घरे व काही इमारती अशी मिळून तब्बल ७३ निवासी बांधकामे या पावसाळ्यापूर्वी धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यापैकी अतिधोकादायक इमारतींचे नव्याने सर्वेक्षण केले जात असून, येथील रहिवाशांचे नेमके कुठे पुनर्वसन करायचे, असा प्रश्न नगरपालिका प्रशासनास पडला आहे.
बदलापुरातही धोकादायक इमारती
बदलापुरातही चाळी, बैठी घरे व इमारती असे मिळून यावर्षी सात बांधकामे धोकादायक असून पावसाळ्यापूर्वी पालिकेच्या नगर अभियंत्यांनी यांना नोटिसा बजावल्याचे सांगितले आहे. यापैकी कात्रप भागातील गणेश कृपा को-ऑप. हौ. सोसायटी दुकानांसमोरील व्हरांडय़ाचा स्लॅब कोसळून स्लॅबवरील पानाची टपरी सात ते आठ फूट खोल नाल्यात पडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी व मोठी वित्तहानी झाली नव्हती. परंतु या घटनेने बदलापुरातील धोकादायक बांधकामांचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.