५०हून अधिक गुन्ह्यतील आरोपी अटकेत

कल्याण : देशाच्या विविध भागांत ५० हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या दरोडेखोराला कल्याण पोलिसांनी वासिंद येथून अटक केली. कल्याण, उल्हासनगर परिसरात चार गुन्हे केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

आरोपी मुकेश मेनन, त्याचा साथीदार राजू ऊर्फ अब्बास उखाणी हे कल्याण परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कल्याणमध्ये एचडीएफसी बँक परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी संशयास्पदरीत्या फिरत असलेले एक चारचाकी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालकाने गस्तीवरील अमोल गोरे या पोलिसाच्या अंगावर वाहन घातले. सुदैवाने ते बचावले. वाहनचालक त्याच्या साथीदारासह पळून गेला. या वाहनात आरोपी मेनन असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. मुकेश मेनन हा वासिंद परिसरात पेहराव बदलून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वासिंद भागात सापळा लावला. त्यात मेनन अडकला. गुजरात, आंध्र प्रदेश, दीवदमण यासह अनेक राज्यांत मेनन याने चोऱ्या केल्या आहेत.

हसमुख शहाला अटक

ठाणे : नौपाडा येथील विष्णुनगर भागात उद्वाहनाचा दरवाजा उघडा राहिल्याने राहुल पैठणकर यांना मारहाण करणाऱ्या हसमुख शहाला बुधवारी नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

विष्णुनगर येथील सुयश अपार्टमेंट या इमारतीत राहुल पैठणकर (३८) हे राहतात. काही दिवसांपूर्वी ते आईसोबत इमारतीखाली येत असताना त्यांच्याकडून उद्वाहनाचा दरवाजा उघडा राहिला होता. याचा जाब इमारतीत राहणाऱ्या हसमुख शहाने राहुल यांना विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर हसमुख याने राहुल यांच्यासोबत वाद घालत त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर मराठी तरुणाला गुजराती व्यक्तीने अपशब्द वापरून मारहाण केल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने हा वाद चिघळला. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी हसमुखला अटक केली.

वज्रेश्वरीत महिलेची हत्या

ठाणे : भिवंडी येथील वज्रेश्वरी भागात कामावरून घरी परतणाऱ्या एका महिलेची हत्या झाल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.  वज्रेश्वरी येथील गोठणपाडा या परिसरात राहणारी एक २९ वर्षीय महिला वसई येथे कामाला जाते. रविवारी कामाहून घरी परतत असताना तिचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर या महिलेचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आला. रविवारी सायंकाळी हा मृतदेह येथील स्थानिक रहिवाशांना मिळाल्यानंतर याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

व्यायामशाळेतील ३० लाखांचे साहित्य जाळले

ठाणे : घोडबंदर येथील आनंदनगर भागात एका व्यायामशाळेतील ३० लाख रुपयांचे साहित्य जाळल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.