भिवंडीकडे रेल्वे रुळांतून धोकादायक प्रवास

भगवान मंडलिक, लोकसत्ता

डोंबिवली : १७ मेपर्यंत विदेशी दारूची दुकाने उघडत नाही हे लक्षात येताच कल्याण-डोंबिवली तसेच आसपासच्या परिसरातील मद्यशौकिनांनी गावठी दारू मिळविण्यासाठी भिवंडीच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. डोंबिवलीतील अनेक ग्राहक मागील दीड महिन्यापासून रेतीबंदर रेल्वे फाटकातून भिवंडीकडे रेल्वे मार्गातून पायपीट करीत सातपुलावरून ये-जा करतात.

कल्याण, डोंबिवली परिसरातील विदेशी, चोरून सुरू असलेले गावठी दारूचे अड्डे मागील दीड महिन्यापासून बंद आहेत. डोंबिवली पूर्वेतील सागाव, पश्चिमेतील कुं भारखाणपाडा, चिंचोडय़ाचा पाडा भागात गावठी दारूचे अड्डे आहेत. टाळेबंदीमुळे ते बंद आहेत. या अड्डेचालकांना घाऊक दारू मलंगपट्टी, देसई, हेदुटणे, भिवंडी ग्रामीण भागातून मिळणे बंद झाले आहे.

भिवंडी ग्रामीण भागातील गावठी दारू तयार करणारे गाव परिसरातील जंगलात रात्रीच्या वेळेत भट्टी पेटवितात. दारू गाळून त्यामध्ये राजरोस पाणी ओतून ती डोंबिवली पश्चिमेतील सातपूल (देवीचापाडा) भागातील झुडपांमध्ये विक्रीसाठी घेऊन बसतात. पहाटेच्या वेळेत अड्डय़ावरून ही दारू विक्रीसाठी आणली जाते. सकाळपेक्षा संध्याकाळच्या वेळेत या अड्डय़ांवर दारू पिण्यासाठी तळीरामांनी

झुंबड केलेली असते. डोंबिवलीतील बहुतांशी तळीराम देवीचापाडा, रेतीबंदर येथील रेल्वे मार्गातून भिवंडीच्या दिशेने चालत जातात.

गावठी दारूची बाटली यापूर्वी १०० रुपयांना मिळायची तीच बाटली आता ४०० ते ५०० रुपयांना विकली जाते, असे एका ग्राहकाने सांगितले. लिटरचा दर बाराशे ते तेराशे रुपये झाला आहे. पहिल्या धारेच्या दारूच्या २५ लिटर फुग्यात १० लिटर पाणी टाकून सध्या गावठी दारू विकली जाते, असे एका माहीतगाराने सांगितले.

रेतीबंदर ते सातपूल भागात किंवा तेथून पुढे भिवंडी हद्दीत डोंबिवलीतील रहिवासी दारू पिण्यासाठी लोहमार्गातून जात असतील किंवा या भागातील पुलाच्या भागात दारूदुकान कोणी चालवीत असेल तर त्या भागात गस्त वाढवली जाईल. त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल.

– राजेंद्र मुणगेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णुनगर पोलीस ठाणे.

रेतीबंदर ते सातपूलपर्यंत विष्णूनगर पोलीस ठाण्याची हद्द आहे. रेल्वे मार्गाच्या बाजूला गर्दी जमत असेल तर विष्णूनगर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करणे अपेक्षित आहे.

– सतीश पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग