आशीष धनगर

ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी मुंब्रा येथील खाडीवर उभारण्यात आलेल्या लोखंडी पुलावर परिसरातील तरुण सेल्फी घेण्यासाठी गर्दी करू लागले आहे. पुलावर जमणारी गर्दी पाहता एखाद्याचा तोल गेल्यास अपघातही घडू शकतो, अशा तक्रारी रेल्वे पोलिसांकडे दाखल होऊ लागल्या आहेत.

फेसबुक, इन्स्टाग्राम, टिक टॉक या माध्यमांवर छायाचित्रे, सेल्फी, स्वतच्या अभिनयाची एखादी चित्रफीत टाकण्याचे वेड हल्ली अनेकांना लागले आहे. आपली पोस्ट जगावेगळी असावी आणि ती लोकप्रिय व्हावी, यासाठी वेडे साहस करणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. अशा प्रकारे धोकादायक ठिकाणी सेल्फी टिपताना अनेकांना अपघात झाले आहेत. असाच एक धोकादायक सेल्फी पॉइंट मुंब्रा-दिव्यादरम्यान निर्माण झाला आहे.

मुंब्रा ते दिवा स्थानकाच्या दरम्यान नव्याने उभारण्यात आलेल्या लोखंडी रेल्वे खाडीपुलावर तरुण छायाचित्रे, सेल्फी टिपण्यासाठी जमू लागले आहेत. टिक टॉक अ‍ॅप्लिकेशनच्या साहाय्याने स्वअभिनयाच्या चित्रफिती तयार करण्यासाठी अनेक तरुणांचे गट तिथे आलेले दिसतात. यात शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. काम सुरू असणाऱ्या या पुलावर संरक्षणासाठी कोणताच आधार नाही. कोणत्याही सामान्य व्यक्तीला या पुलावरून चालत जाता येईल असा हा सुरक्षित पूल नाही. तरीही ही मुले विनाकारण जीव धोक्यात घालून या पुलावर जातात.

पुलाच्या सांगाडय़ाच्या मागील बाजूस खाडीचे असल्याने खाडीचे दृश्य कॅमेरात टिपता येते. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी येथे अनेक मुले जमतात. पुलाजवळच रेल्वे सुरक्षा दलाची पोलीस चौकी आहे. मात्र जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणांकडे रेल्वे पोलीसही दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.

पुलाची सद्यस्थिती

हा लोखंडी खाडी पूल साधारण ६० ते ७० फूट लांब आहे. या पुलाच्या बांधकामासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी सळया उघडय़ा पडलेल्या आहेत. संरक्षक कठडा बांधण्यात आलेला नाही. तिथे जाणऱ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.

पुलाच्या जवळ असलेल्या पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी छायाचित्रण करणाऱ्या तरुणांना हटकायला हवे. त्यांना तिथे जाण्यापासून रोखायला हवे. पूल रेल्वेचा असल्याने त्याचा पृष्ठभाग रस्त्यासारखा सरळ नाही. त्यामुळे तेथे अपघात होऊ शकतात. या प्रकाराकडे गांभीर्याने पाहायला हवे.

– विजय भोईर, संस्थापक, जागा हो दिवेकर संस्था

मुंब्रा येथील रेल्वे खाडी पुलावर छायाचित्रण केले जात असल्यास त्याची माहिती घेण्यात येईल. तसेच त्या पुलावर लक्ष ठेवण्यात येईल.

– ए. के. यादव, वरिष्ठ उपनिरीक्षक, आरपीएफ, मुंब्रा