पतंगांच्या मांज्यांमुळे ६ पक्ष्यांचा बळी, २२ जखमी

मकरसंक्रांतीनिमित्त वसई-विरार परिसरात अनेकांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला असला तरी त्यामुळे सहा पक्ष्यांना जीव गमवावा लागला, तर अनेक पक्षी जखमी झाले आहेत. पक्षिमित्रांना २२ पक्ष्यांना वाचवण्यात यश आले आहे.

दरवर्षी मकरसंक्रांतीच्या सणाच्या वेळी मोठय़ा प्रमाणात पक्षी जखमी होतात. पतंगाच्या मांज्यामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी वसईत ‘श्री समकित युवक मंडळ’ यांच्या वतीने गेल्या १३ वर्षांपासून वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. यंदा १३ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्याने वसई, नालासोपारा या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शहरातील अनेक ठिकाणी जखमी झालेल्या पक्ष्यांना भरती करण्यात आले. जखमी झालेल्यांमध्ये कबुतर, पोपट, घुबड, घार अशा पक्ष्यांचा समावेश होता.

पतंगाच्या धारदार मांज्यामुळे पक्षी जखमी होतात. अनेक पक्ष्यांच्या पंखाला, मानेला, पायाला दुखापत झाली होती, अशी माहिती पक्षिमित्रांनी दिली. या तीन दिवसांत २८ पक्षी उपचारासाठी आणले होते. यामधील २२ पक्ष्यांचा जीव वाचवण्यात यश आले, तर सहा पक्ष्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे भावेश पारेख यांनी सांगितले.

कबुतर : २५ (यापैकी ६ कबुतरांचा मृत्यू)

पोपट : १

घुबड : १

घार : १

* कबुतर : २५ (यापैकी ६ कबुतरांचा मृत्यू)

*  पोपट : १

*  घुबड : १

*  घार : १