हेमेंद्र पाटील

चोऱ्या, अपघातांत वाढ; दुरुस्तीचे कोटय़वधी रुपये पाण्यात

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) तारापूर वसाहतीतील पथदिवे गेल्या महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे रात्री परिसर अंधारात बुडून जात असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. एमआयडीसी अधिकारी आणि उद्योजक मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.

एक हजार ४०० उद्योग असलेल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रात सुमारे एक हजार ९०० पथदिवे आहेत. त्यांपैकी निम्म्याहून अधिक बंद आहेत. केवळ मुख्य रस्ता आणि चैकातील दिवे सुरू आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत बऱ्याच भागांत संध्याकाळनंतर अंधार पसरत आहे. टाकी नाका, अमुल कंपनी परिसर, कुंभवली नाका तसेच ई, डी, टी, एल व एम या झोनमधील पथदिवे बंद आहेत. बोईसर-नवापूर रोड ते टाकी नाकादरम्यानच्या रस्त्यांचे काम वर्षभरापूर्वीच करण्यात आले होते. त्या वेळी या रस्त्याच्या मध्यभागी लावण्यात आलेले पथदिवे वर्षभरातच बंद पडले. त्यामुळे या महागडय़ा पथदिव्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एमआयडीसीच्या विद्युत देखभाल दुरुस्ती विभागाकडून पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पाच वर्षांचा कालावधीचे कंत्राट देण्यात आले असून वर्षांकाठी चार लाख रुपये खर्च केले जातात, मात्र कंत्राटदाराकडून केवळ ठरावीक ठिकाणी दुरुस्तीचा दिखावा केला जातो. येथील अनेक मोठय़ा कारखान्यांत कामगार १२-१२ तास काम करतात. रात्री सात-आठच्या सुमारास हजारो कामगार घरी जाण्यासाठी निघतात. दुसऱ्या पाळीतील कामगार रात्री साडेदहा ते सव्वाअकराच्या दरम्यान निघतात. त्यामुळे या दोन्ही वेळी रस्त्यांवर वर्दळ असते. बरेच कामगार चालत किंवा सायकलवरून प्रवास करतात. त्यांना दुचाकीस्वरांची किंवा मोठय़ा वाहनांची धडक बसल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत.

अंधाराचा फायदा घेऊन रोहित्रांची किंवा ऑइलची चोरी केली जाते. कारखान्यांतील यंत्रांच्या भागांचीही चोरी होते. काही उद्योजक अंधाराचा गैरफायदा घेत घातक घनकचरा आणि प्रदूषित सांडपाणी उघडय़ावर सोडून देतात. पगाराच्या दिवशी चोऱ्या होतात. पथदिवे बिघडल्याचा त्रास कामगार व वाहतूकदारांना सहन करावा लागत आहे.

एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव

तारापूर औद्योगिक वसाहतीत एलईडी पथदिवे लावण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्याबाबत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये नवीन एक हजार ५०० एलईडी पथदिवे लावण्यात येणार असल्याने त्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

पथदिवे बंद का पडतात?

पथदिव्यांना पुरवण्यात येणाऱ्या विजेच्या दाबात सतत बदल होत असल्यामुळे पथदिवे बंद पडतात. विजेचा दाब नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युत दाब नियंत्रण उपकरण बसविणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येते.

गटारांमुळे अपघात

नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या कडेला खोल गटारे बनविण्यात आली आहेत. अंधारात गटार दिसत नाही त्यामुळे काही वाहनांचे अपघात झाले आहेत. अंधारामुळे कामगारांच्या मनात भाती आहे.

नवीन पथदिव्यांसाठी निविदा काढण्यात आली आहे. दोन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. चार महिन्यांत सर्व भागांत पथदिवे सुरू होतील.

– रवींद्र अनासने, उपअभियंता, विद्युत देखभाल दुरुस्ती विभाग