कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश केलेल्या २७ गावांमधील रस्ते, पदपथांवरील दिवे बंद असल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडत घरी जावे लागत आहे. गावांच्या परिसरात मोठी गृहसंकुले आहेत. या संकुलांमधील रहिवाशांनाही या अंधाराचा फटका बसत आहे.
या भागातील रस्त्यांवर दिवे नसल्याने या ठिकाणी राहणाऱ्या चाकरमान्यांचे रात्री घरी परतताना हाल होत आहेत. रात्री उशिरा घरी परतणाऱ्या महिलांना घरातील एखाद्या व्यक्तीला बस किंवा रिक्षा थांब्यावर बोलवावे लागते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरात रस्त्यांवरील दिवे बंद आहेत. काही नागरिकांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र हा परिसर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत मोडतो त्यामुळे त्यांच्याकडे तक्रारी करा, असा सूर लावला जात आहे.
महापालिकेत यासंबंधी वारंवार तक्रारी करूनही फारसा उपयोग होत नाही, अशा रहिवाशांच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागातील विद्युत कामांच्या देखभालीसाठी अर्थसंकल्पात १ कोटी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या भागातील रस्तेही उखडले आहेत. सर्वत्र अंधार आणि खड्डेमय रस्ते यामुळे येथून वाहन चालवितानाही अडचणी उभ्या राहत आहेत.

दुरुस्तीची कामे सुरू
२७ गावांमधील रस्त्यांवरील दिवे दुरुस्ती, देखभालीचे काम प्रल्हाद भोईर या ठेकेदाराला देण्यात आले आहे. पावसामुळे काही ठिकाणचे दिवे बंद पडल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची सोडवणूक करण्याचे काम सुरू आहे. गावांमधील एकही रस्ता दिवे बंद राहून काळोखात राहणार नाही, असे आदेश ठेकेदाराला दिले आहेत.
– भागाजी भांगरे
ई विभाग, प्रभाग क्षेत्र अधिकारी