रस्ता रुंदीकरणासाठी निर्णय; ठाणे पालिकेतर्फे निविदा प्रक्रिया सुरू

कल्याण : कल्याण- शिळ- मुंब्रा- तळोजा या मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी शिळफाटा चौकातील प्रसिद्ध अशा दत्तमंदिराचे स्थलांतर करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शिळफाटा चौकात उभारण्यात येणारा उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरणाची कामे महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे महापालिका करणार आहे. शिळफाटा चौकात (कल्याण फाटा) पुरातन दत्तमंदिर आहे. हे मंदिर ६० मीटर रस्ता रुंदीकरणात बाधित होत असल्याने महापालिकेने मंदिर विश्वस्तांना विश्वासात घेऊन ते बाजूला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
‘आयसर’च्या प्रवेष परीक्षेची तारीख जाहीर; अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू

शिळफाटा चौकातून नवी मुंबई, पनवेल, ठाणे आणि कल्याण दिशेने २४ तास वाहतूक सुरू असते. गेल्या १० वर्षांत वाहन संख्या वाढल्याने अरुंद शिळफाटा  रस्ता वाहनांसाठी अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये तीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला आहे. या प्रकल्पातील एक टप्पा म्हणजे शिळफाटा चौकातील रस्त्याचे रुंदीकरण आहे. या रुंदीकरणात परमपूज्य डी. के. दास बाबा सीताराम सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या दत्तमंदिर, गावदेवी मंदिराचा पूर्ण भाग स्थलांतरित करावा लागणार आहे. मूलभूत सुविधा महत्त्वाच्या असल्याने ट्रस्टने या विकासकामाला विरोध न करता मंदिराची जागा रस्ते कामासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे एका विश्वस्ताने सांगितले. ठाणे पालिकेने या रस्ता रुंदीकरणासाठी मंदिर परिसरातील जमिनीचे भूसंपादन करून दिल्यानंतर प्राधिकरणाकडून या भागात रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ठाणे पालिकेच्या नगरविकास विभागाने रस्ता रुंदीकरणात बाधित गावदेवी मंदिराचे बाजुच्या भागात स्थलांतर करणे आणि तिथे मंदिर उभारणीच्या कामासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. पहिल्या निविदेस ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. निविदा सूचना माहिती ६ एप्रिलपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ९ एप्रिलला दाखल निविदा उघडण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, असे ठाणे पालिकेच्या नगर अभियंत्यांनी जाहीर केले.

मंदिर विश्वस्तांमध्ये नाराजी

दत्तमंदिराच्या विश्वस्तांनी मंदिर स्थलांतराला ठाणे पालिकेला परवानगी दिली असली तरी मंदिराची उभारणी ही विश्वस्तांनी सुचविलेल्या आराखडय़ाप्रमाणे आणि दाक्षिणात्य मंदिराप्रमाणे झाली पाहिजे, या विश्वस्तांच्या मागणीला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने विश्वस्तांमध्ये नाराजी आहे. विश्वस्तांनी मंदिर उभारणीसाठी खासगी वास्तुविशारदाचा तीन कोटी १३ लाख रुपये खर्चाचा आराखडा प्राधिकरणाला दिला आहे. प्राधिकरणाने या कामासाठी दोन कोटी ६५ लाख मंजूर केले आहेत. ठाणे पालिका, प्राधिकरण यांनी मंदिर विश्वस्तांशी मंदिर कसे, कोठे बांधणार याविषयी चर्चा न करताच निविदा प्रसिद्ध केली आहे, असे विश्वस्तांनी सांगितले. रुंदीकरणाला विश्वस्तांचा विरोध नाही, पण हजारो वर्षे टिकेल अशा पद्धतीने लोखंडाचा वापर नसलेले दाक्षिणात्य पद्धतीचे मंदिर उभारणीचा विश्वस्तांचा मनोदय आहे. या संदर्भात ठाणे पालिकेला पत्र दिले आहे. त्यांनी नियोजनाप्रमाणे काम होईल असे स्पष्ट केले आहे, असे ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी सांगितले.