दहावीची परीक्षेसाठी ठाकुर्लीतील विद्यार्थिनीने धीर एकवटला; मुख्याध्यापकांच्या पाठिंब्यामुळे दुसऱ्या दिवशी परीक्षा दिली

‘अभ्यास कर, शिक्षण घेत पुढे जा आणि स्वत:च्या पायावर उभी राहा’ हा आईचा कानमंत्र घेत शालेय शिक्षणाचे पुढचे टप्पे गाठणारी मुलगी दहावीपर्यंत पोहोचली. मुलगी शालेय शिक्षणाच्या एका वेगळ्या टप्प्यावर उभी असल्याचे पाहून आईला आनंद झाला होता. आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास मुलीने घेतला. मुलीची दहावीची परीक्षा सुरू होती. मात्र दुर्दैवाने परीक्षेच्या काळातच शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारी आईच अचानक हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मरण पावली. उद्या भूमितीचा पेपर. घरात आईचे पार्थिव. अशा परिस्थितीत भेदरलेल्या मुलीला शिक्षकांनी धीर दिला. तिने रात्रभर आईच्या पार्थिवाजवळ बसून भूमिती पेपरचा अभ्यास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आईच्या मृत्यूचे दु:ख हृदयावर ठेवून तिने पेपर लिहिला आणि पेपर सुटल्यानंतर तिच्या उपस्थितीत आईला अखेरचा निरोप देण्यात आला.

ठाकूर्ली पूर्व भागात राहणाऱ्या जाधव कुटुंबातील ही घटना. कष्टकरी, सामान्य कुटुंबातील जाधव कुटुंबात जयश्री रमेश जाधव ही मुलगी कष्टकरी आई, वडील आणि एका भावासमवेत राहते. कुटुंबगाडा चालविण्यासाठी आणि मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई एका रुग्णालयात काम करीत होती. स्वत:वर जी वेळ आली ती मुलांवर येऊ नये, म्हणून दोन्ही मुलांनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहावे हा आईचा ध्यास. मुलगी जयश्रीला ती सतत अभ्यास करून मोठे होण्याचा कानमंत्र देत होती. जयश्री दहावी झाली की, नंतर महाविद्यालयात जाणार. उच्च शिक्षण घेणार, अशी स्वप्ने आई पाहत होती. जयश्रीला दहावीला आहे. भूमिताचा पेपर होता. त्याच दिवशी रात्री दीड वाजता जयश्रीच्या आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचे निधन झाले. जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. जयश्री हादरून गेली. धीर देणारी आई अचानक सोडून गेल्याने ती कोलमडून पडली.

जयश्री शिक्षण घेत असलेल्या ठाकुर्ली पूर्वेतील न्यू मॉडेल स्कूल (मराठी माध्यम) शाळेचे मुख्याध्यापक आर. आर. पाटील आणि सहशिक्षक जयश्रीच्या घरी आले. जयश्रीला त्यांनी धीर दिला. घडल्या प्रकाराबद्दल दु:ख व्यक्त करून, आता आईने स्वप्न पूर्ण कर. दु:ख बाजूला ठेवून परीक्षेला सामोरी जा, असा सल्ला दिला. जयश्रीलाही ते पटले. आईच्या शवाजवळ बसूनच पहाटेपर्यंत तिने अभ्यास केला. परीक्षा दिली.

न्यू मॉडेल स्कूलमधील जयश्री जाधव ही हुशार विद्यार्थिनी. अभ्यासात ती नेहमी पहिली असते. तिचा भूमितीचा पेपर त्याच दिवशी आईचे निधन झाल्याने ती पेपर देणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला. स्वत: तिच्या घरी गेलो. तिला दु:खातून सावरले. तिला आईच्या दु:खापासून थोडे दूर ठेवून अभ्यास करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने भूमिती पेपरचा पहाटेपर्यंत अभ्यास केला. दु:ख करून वर्ष फुकट घालविण्यापेक्षा अभ्यास आणि वर्ष किती महत्त्वाचे आहे हेही जाधव कुटुंबीयांनी मान्य केले. यामध्ये जयश्रीच्या धाडसाचे कौतुक आहे.

-आर. आर. पाटील, मुख्याध्यापक न्यू मॉडेल स्कूल, ठाकुर्ली पूव