मृतांच्या आकडेवारीचा फेरआढावा घेऊन अद्ययावत यादी

अंबरनाथ : राज्य शासनाच्या आदेशानुसार अंबरनाथ नगरपालिकेने शहरातील करोना मृत्यूच्या आकडय़ांचा फेरआढावा घेऊन त्याद्वारे अद्ययावत यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतांच्या संख्येत आणखी १९४ मृत्यूंची भर पडणार असल्याचे समोर आले आहे. त्यास पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दुजोरा दिल्याने अंबरनाथ शहरातील मृतांचा आकडा ६०० होणार आहे, तर मृतांच्या आकडय़ाबाबत कायम संभ्रमात असलेल्या बदलापूर शहरात पालिका प्रशासनाने आता माहिती अद्ययावतीकरणाचे काम सुरू केले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा मृतांची संख्या अधिक होती. शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी लागणाऱ्या रांगा त्याचे उदाहरण होते. करोनामुळे मृत्यू झालेल्या अनेक मृतांची नोंद पालिकेच्या दफ्तरी नसल्याचे दिसून आले होते. अशा मृतांची माहिती संकलित करून मृतांची यादी अद्ययावत करण्याचे आदेश राज्य शासनाने नुकतेच दिले आहेत. त्यानंतर पालिकांनी मृतांची यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू केले आहे. अंबरनाथ शहरात दुसऱ्या लाटेत अनेक नव्या रुग्णालयांना कोविडचा दर्जा मिळाला होता. त्या रुग्णालयातील मृतांचे आकडे पालिकेकडे अद्ययावत झाले नसल्याचा आरोप यापूर्वीही होत होता. अंबरनाथ शहरात आतापर्यंत ४११ नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. परंतु विविध खासगी रुग्णालयांमध्ये मार्च ते मे २०२१ या काळात करोनामुळे मृत्यू झालेल्या १४४ जणांच्या मृत्यूची नोंदच झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इतर शहरांमध्ये उपचार घेणाऱ्या करोना मृत्यूंचा आकडा ५० च्या आसपास असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खुद्द अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अंबरनाथ शहरातील करोना मृतांच्या आकडेवारीत १९४ मृतांची भर पडणार आहे. यामुळे शहरातील मृत्यूंचा आकडा ६०० वर पोहोचणार आहे. सध्या इतकी माहिती समोर आली असून संबंधित विभाग अजूनही माहिती गोळा करत असल्याचेही रसाळ यांनी सांगितले. त्यामुळे अंबरनाथमधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

बदलापूरचीही यादी अद्ययावत

मांजर्लीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेल्या करोना मृतदेहांचा आकडा आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिका घोषित करत असलेली करोना मृतांची संख्या यात प्रचंड तफावत असल्याचे यापूर्वीच ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. १० जून रोजी मृतांचा आकडा २५४ पर्यंत पोहोचला होता. सध्याची यादी अद्ययावत असून पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात १९ मृत्यूंची नोंद करण्यात आली होती, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी दिली. अजूनही माहिती अद्ययावत केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र स्मशानातील करोना मृतांचे अंत्यविधी आणि पालिकेचा आकडा याबाबत आजही संशय व्यक्त केला जात आहे.

खासगी रुग्णालयांकडून माहिती घेण्याचे काम

उल्हासनगर शहरात आतापर्यंत ४७९ करोना मृत्यूंची नोंद करण्यात आली असून ही यादी दररोज अद्ययावत केली जात असल्याचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. तरीही खासगी रुग्णालयांकडून माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.