परिचारिका झोपी गेल्यामुळे प्रकार घडल्याचा आरोप; प्रशासनामार्फत सखोल चौकशीचे आदेश

ठाणे येथील बाळकुम भागातील महापालिकेच्या प्रसूतिगृहामध्ये दाखल केलेल्या एका महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्याने मदतीसाठी आवाज देण्याकरिता ती उभी राहिली आणि त्याच वेळेस तिची प्रसूती होऊन तिचे बाळ जमिनीवर पडून मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी उजेडात आली.

शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या घटनेची माहिती देताच अवघे सभागृह हळहळले. परिचारिकांचे दुर्लक्ष आणि डॉक्टरांची अनुपस्थिती यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप भोईर यांनी केला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त  केल्यानंतर याप्रकरणी सखोल चौकशी सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

ठाणे महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी बाळकुम प्रसूतिगृहामध्ये एका महिलेला कसे बाळ गमावावे लागले, याचा घटनाक्रमच सांगितला. बाळकुम येथील देवरामनगर परिसरात राहणारे विनोद चव्हाण यांची पत्नी कविता गर्भवती असल्यामुळे प्रसूतीसाठी त्यांचे नाव बाळकुम येथील प्रसूतिगृहात नोंदवण्यात आले होते. १९ जून रोजी सकाळी कविता यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे चव्हाण कुटुंबीयांना कविता यांना प्रसूतिगृहात नेले. मात्र तपासणीनंतर प्रसूतीला वेळ असल्याचे सांगत डॉक्टरांनी त्यांना पुन्हा घरी पाठवले. रात्री दहा वाजता पुन्हा त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे कविता पुन्हा प्रसूतिगृहात आल्या. मात्र त्या वेळेस डॉक्टर हजर नसल्यामुळे परिचारिकांनीच तपासणी करून त्यांना पुन्हा घरी पाठवले. रात्री १२ वाजता कविता यांच्या वेदना वाढल्याने कुटुंबीयांनी त्यांना प्रसूतिगृहात आणले. त्या वेळेस त्यांना दाखल करून घेण्यात आले. मात्र परिचारिकांनी तपासणीनंतर प्रसूतीसाठी वेळ असल्याचे त्यांना सांगितले. रात्री साडेतीनच्या सुमारास परिचारिका विद्युत दिवे बंद करून विश्रामगृहात जाऊन झोपल्या. त्याच वेळेस कविता यांना जोरात प्रसववेदना होऊ लागल्या. परिचारिकांना आवाज देण्यासाठी त्या उठून उभ्या राहिल्या असतानाच त्यांची प्रसूती होऊन बाळ जमिनीवर पडले व तात्काळ मृत्युमुखी पडले, असा गंभीर आरोप भोईर यांनी सभागृहात केला.

भोईर यांनी सांगितलेल्या या घटनाक्रमानंतर सर्वसाधारण सभेतील सर्वच सदस्य आक्रमक झाले व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर स्पष्टीकरण देताना मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले. ‘दोन महिला डॉक्टर याप्रकरणी चौकशी करत असून त्याचा अहवाल सायंकाळपर्यंत मिळेल. त्याआधारे कारवाई करण्यात येईल,’ असे उत्तर त्यांनी दिले.

‘पालिका रुग्णालयांत ढिसाळ कारभार’

कळवा रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटात कापड ठेवल्याची एकच घटना उघडकीस आली असून अशीच एक घटना यापूर्वी घडली आहे. मात्र ती समोर आली नव्हती. या महिलेवर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करावी लागली. अशा घटनांमुळे गरीब रुग्णही कळवा रुग्णालयात उपचार नको असे म्हणत असून कर्ज काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका अर्पणा साळवी यांनी केला.