भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली बेकायदा इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली. या दुर्घेटनेतील मृत्यूची संख्या २० वर पोहचली आहे. त्यात सात मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत २५ जण जखमी झाले. अत्यंत दाटीवाटीच्या क्षेत्रात असलेली इमारत आणि ढिगाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता यांमुळे मदत पथक वेळेवर पोहोचूनही प्रत्यक्षात बचावकार्य सुरू होण्यात बऱ्याच अडचणी आल्या.

इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे जाऊन शिंदे यांनी जखमींची विचारपूस केली. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून, अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही त्यांनी सांगितले.

सुमारे ४५ वर्षे जुन्या या इमारतीत ४० कुटुंबे राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश होता. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही महापालिकेने बजावली होती. जिलानी इमारत दुर्घटनाप्रकरणी तत्कालीन प्रभाग समिती -३ साहाय्यक आयुक्त सुदाम जाधव आणि अभियंता दुधनाथ यादव यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिले. तसेच या दुर्घटनेबाबत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये साहाय्यक नगररचनाकारांचाही समावेश आहे.

१८ मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:
१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
२)फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
३)आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
४)बब्बू(पु/२७वर्ष)
५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
७) उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
८) असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
१०) सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)
११) नाजो अन्सारी (स्त्री/२६)
१२) सनी मुल्ला शेख (पु/७५)
१३) अस्लम अन्सारी (पु/३०)
१४) नजमा मुराद अन्सारी (स्त्री/५२)
१५) आमान इब्राहिम शेख (पु/२२)
१६) अफसाणा अन्सारी (स्त्री/१५)
१७) शाहिद अब्दुला खान (स्त्री/३२)
१८) असद शाहिद खान (पु/३ वर्ष)