कल्याणमधील धक्कादायक घटना
वाहतूक विभागाचे कर्मचारी आपली दुचाकी उचलून नेत असताना त्यांना तसे न करण्याची विनंती करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी कल्याणमध्ये घडली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. रात्री उशिरापर्यंत या घटनेची महात्मा फुले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.
कल्याण पश्चिमेकडील महालक्ष्मी हॉटेल परिसरात बुधवारी सायंकाळी वाहतूक विभागाचे कर्मचारी अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी जप्त करत होते. त्याच जागी एक व्यक्ती आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून मित्राची वाट पाहात होती. त्या व्यक्तीची दुचाकीही वाहतूक विभागाचे कर्मचारी टोइंग व्हॅनने उचलू लागले. हे पाहताच संबंधित व्यक्तीने त्यांना तसे न करण्यास विनवले. आपण येथेच उभे असून दुचाकी जप्त न करण्याची विनंती संबंधित व्यक्तीने पुनपुन्हा केली. मात्र, ‘वाहतूक विभागाच्या शाखेत येऊन पैसे भरा आणि दुचाकी घेऊन जा’, असे उत्तर त्या व्यक्तीला कर्मचाऱ्यांनी दिले. तरीही संबंधित व्यक्तीने टोइंग व्हॅनचा पाठलाग करणे व विनवण्या सुरूच ठेवले. त्यातच त्यांना चक्कर आली व ते खाली कोसळले. उपचारासाठी संबंधित व्यक्तीला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. मयत व्यक्ती एका खासगी बँकेचे निवृत्त अधिकारी असल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.