गर्दीच्या वेळी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल

ठाणे : मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’च्या इंजिनमध्ये शुक्रवारी सायंकाळी बिघाड झाल्याने ही एक्स्प्रेस तब्बल अर्धा तास ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर थांबून होती. त्यामुळे मुंबईहून कल्याण, कर्जत, कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील रेल्वे धिम्या मार्गावरून चालविण्यात आल्या. या रखडपट्टीचा प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

गेल्या महिन्याभरापासून मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यातच शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’च्या इंजिनमध्ये बिघाड झाला. सुमारे अर्धा तास ही एक्स्प्रेस ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर थांबून होती. त्यामुळे कल्याण, कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील गाडय़ा धिम्या मार्गिकेवरून चालविण्यात आल्या. उद्घोषणाही वेळेत होत नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही एक्स्प्रेस ठाणे रेल्वे स्थानकातून पुण्याच्या दिशेने रवाना झाली. मात्र, त्यानंतरही मध्य रेल्वेवरील उपनगरीय गाडय़ा १० मिनिटे उशिराने धावत होत्या.

ट्रान्स हार्बरवरही गोंधळ

सकाळी १० च्या सुमारास ठाण्याहून वाशीला जाणाऱ्या एका गाडीमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे सकाळी ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नोकरदारांचे चांगलेच हाल झाले. ठाण्याच्या दिशेने लोकल येत नसल्याने फलाट क्रमांक ९ आणि १० वर प्रवाशांची गर्दी उसळली होती.