ठाणे महापालिकेचा निर्णय
ठाणे : चालू आणि मागील वर्षाचा थकीत कर वसूल करण्यासाठी पालिकेने लागू केलेल्या कर सवलत योजनेला २८ फेबु्रवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. ३१ जानेवारीला योजनेची मुदत संपुष्टात येणार होती.
या योजनेत चालू आणि मागील वर्षाच्या मालमत्ता तसेच पाणी करावर आकारण्यात आलेली शास्ती १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. या कराचा भरणा करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही कर संकलन केंद्र सुरू ठेवण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या योजनेचा नागरिकांना फायदा घेता यावा तसेच कराचा भरणा करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी २८ फेबु्रवारीपर्यंत सुट्टीच्या दिवशी सर्वच कर संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत. सर्व कर संकलन केंद्रे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते सायं. ५ या वेळेत तर सुट्टीच्या दिवशी आणि शनिवारी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
ऑनलाइन सुविधा
महानगरपालिकेच्या DigiThane या अॅपद्वारे मालमत्ता कराचा भरणा केल्यास त्यावरही सवलत मिळणार आहे. तसेच महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2021 1:26 am