कुळगाव-बदलापूर नगरपालिका हद्दीतील स्थलांतरित व दुबार असलेली ४१ हजार नावे वगळण्याबाबत आज (१६ जुलैला) दुपारी तीन वाजता मुरबाड तहसील कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी अर्चना कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दिली.
बदलापूर पालिका हद्दीत दुबार तिबार, आणि स्थलांतरित तसेच यादीत फोटो नसलेली ४१ हजारांवर नावे मतदार यादीत आढळली आहेत. या नावांमुळे नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीवेळी मोठा गदारोळही झाला होता. काही उमेदवारांनी या संदर्भात न्यायालयातही दाद मागितली होती. बोगस मतदारांमुळे निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याचा मुद्दाही काही उमेदवारांनी उपस्थित केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने याचे गांभीर्य ओळखून अशा मतदारांचा शोध घेण्याची मोहीम नुकतीच राबवली होती. त्यात ही ४१ हजार बोगस नावे उघडकीस आली आहेत. त्यामुळे आता ही नावे वगळण्या संदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित केल्याचे पवार यांनी सांगितले.
या बैठकीसाठीची माहिती शहरातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना कळविण्यात आलेली आहे. तरीही ज्यांना कळले नसेल त्यांनीही या बैठकीस अवश्य उपस्थित राहून निवडणूक आयोगाच्या या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही पवार यांनी केले आहे. बदलापूर शहरात स्थलांतरित मतदारांची संख्या जास्त आढळून आली आहे. त्याचप्रमाणे ज्या मतदारांची यादीत नावे आहेत मात्र त्यांची छायाचित्रे नाहीत अशांचीही नावे या यादीमधून वगळण्यात येणार आहेत. आता तयार होणारी मतदार यादी ही जास्तीत जास्त बिनचूक करण्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित असून आत्ताच जर यादी तयार होताना लक्ष घातले तर ऐन मतदानाच्या दिवशी बोगस नावे, दुबार नावे, स्थलांतरित नावे आदी तक्रारी राहणार नाहीत म्हणूनच या मोहिमेत सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले.