भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील औद्योगिक वसाहतीतील आस्थापनांना वीजवापरानुसारच देयके पाठवण्यात येतील, असे वीज कंपनीने स्पष्ट केले आहे. यामुळे शेकडो लघुव्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मीरा-भाईंदर शहरातील औद्योगिक वसाहतीतील शेकडो व्यावसायिक आस्थापने टाळेबंदीमुळे बंद होती. दोन महिन्यांपासून एक युनिटही वीजवापर झालेला नसतानाही वीज कंपनीने हजारो रुपयांची अंदाजित वीजदेयके या व्यावसायिकांच्या माथी मारली होती. यामुळे लघुव्यावसायिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अनेक व्यावसायिकांनी वीज कंपनीच्या या अन्यायाविरोधात बोलण्यास सुरुवात केली. ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त प्रसारित केल्यानंतर  व्यावसायिकांच्या वीज कंपनीविरोधातील आवाजाला एक प्रकारे बळ मिळाले.  शहराला वीजपुरवठा करणाऱ्या अदानी वीज केंद्रातील उपमहाव्यवस्थापक स्वीकृत कर्जतकर यांनी अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून औद्योगिक वसाहतीतील आस्थापनांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार वीजदेयके वितरित करण्याचे स्पष्ट केले आहे. या व्यावसायिकांनी स्वत:च वीजवापर नोंदीचे छायाचित्र काढून ते वीजकेंद्राला पाठवण्याचे आवाहनही कर्जतकर यांनी केले आहे.