News Flash

प्राणवायूची पळवापळवी रोखण्यासाठी नवे नियोजन

मुंबई महापालिकेच्या हिश्श्याचा प्राणवायू वळविला नसून गैरसमजातून हा प्रकार घडला असल्याचा दावा ठाणे आणि नवी मुंबई पालिकांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केला.

पुरवठादार कंपन्यांना टँकरचे क्रमांक देण्याचा निर्णय

ठाणे : प्राणवायू पुरवठादार कंपन्यांकडून मुंबई शहरासाठी वितरित झालेला प्राणवायू ठाणे आणि नवी मुंबई पालिकेने परस्पर आपल्याकडील रुग्णांसाठी वळविल्याचा प्रकार नुकताच समोर आला असून असे प्रकार रोखण्यासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये पालिकांना ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणेच प्राणवायूचा पुरवठा व्हावा तसेच त्यांना प्राणवायूचा साठा परस्पर वळविणे शक्य होऊ नये यासाठी प्राणवायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे क्रमांक पुरवठादार कंपन्यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या क्रमांकानुसार कोणता टँकर कोणत्या शहरासाठी आहे हे आधीच ठरविले जाणार आहे. या निर्णयाची   अंमलबजावणी करण्यासाठी प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा समन्वय असावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्यात सर्वत्र प्राणवायूचा तुटवडा जाणवत असताना मुंबईच्या हिश्शाचा तब्बल ११४ मेट्रिक टन  प्राणवायू ठाणे आणि नवी मुंबई पालिकांनी परस्पर आपल्याकडील रुग्णांसाठी वळविल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. यासंबंधी मुंबई महापालिकेने पुरवठादार कंपनीला नोटीस बजावली, शिवाय कोकण आयुक्तांकडे यासंबंधी रीतसर तक्रार नोंदवली आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी कार्यालयात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ठाणे, मुंबई, नवी मुंबई महापालिकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  परंतु गैरसमजातून असे प्रकार पुन्हा घडू नयेत आणि प्रत्येक पालिकांना ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणेच प्राणवायू उपलब्ध कसा होईल यावरही बैठकीत चर्चा झाली. अखेर ठाणे जिल्ह्यातील पालिका आणि मुंबई महापालिकांना प्राणवायू पुरवठा करणाऱ्या वाहनांचे क्रमांक पुरवठादार कंपन्यांना आधीच दिले जातील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यानंतर ठाणे जिल्हा प्रशासनाने अशा वाहनांची यादी पुरवठादारांना तातडीने दिली आहे.

जिल्हा प्रशासनाचे लक्ष

राज्य शासनाने रुग्णसंख्येनुसार ठाणे जिल्ह्यासाठी दररोज २०० मेट्रिक टन प्राणवायूचा कोटा ठरवून दिला आहे. त्यासाठी जेएसडब्ल्यूमधून ७०मेट्रिक टन, आयनॉक्समधून २५ मेट्रिक टन, लिंडेमधून ९३ मेट्रिक टन, मुरबाड आणि पुण्यातून १२ मेट्रिक टन प्राणवायू साठा उपलब्ध होतो. इतका कोटा दररोज उपलब्ध होतो का, यावर आता ठाणे जिल्हा प्रशासन लक्ष ठेवणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ठाणे जिल्ह्यासाठी प्राणवायूची वाहतूक कोणते टँकर करतील आणि ते कोणत्या कंपनीचे असतील यासंबंधीचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार टँकरच्या क्रमांकाची यादी प्राणवायू पुरवठादार कंपन्यांना दिली आहे. यामुळे ठाणे आणि मुंबईत जाणारे टँकर कोणते आहेत हे पुरवठादारांनाही समजू शकेल. -राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:44 am

Web Title: decision to give tanker number to supplier companies akp 94
Next Stories
1 लसटंचाई, अ‍ॅप नोंदणीत अडचणी
2 लसीकरण थंडावल्याने नागरिकांत संताप
3 आरोग्य अधिकारी नियुक्तीचा खेळखंडोबा
Just Now!
X