येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलावामध्ये पोहण्यासाठी उतरण्याचे आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत पावण्याचे प्रकार वाढू लागले असून रविवारी रात्री या तलावात अशाच प्रकारे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सातत्याने घडणाऱ्या या घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता उपवन तलाव परिसरात संरक्षक जाळ्या तसेच सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाण्याच्या खोलीचा माहिती देणारे सूचना फलक लावण्यात येणार असून गस्तीसाठी सुरक्षारक्षकांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे.
ठाणे येथील केणीनगर भागात राहणारे चार मित्र उपवन तलाव परिसरात रविवारी सायंकाळी फिरण्यासाठी आले होते. त्यापैकी लोकेश नाईक आणि योगेश जगताप हे दोघे तलावात पोहण्यासाठी उतरले. या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पंधरा दिवसांपूर्वी एका तरुणाचा अशाच प्रकारे बुडून मृत्यू झाला होता. तसेच तिथे यापूर्वी अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तलावातील पाण्यात बुडून मृत पावण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर महापौर संजय मोरे, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, सभागृह नेत्या अनिता गौरी आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी तलाव परिसराचा पहाणी दौरा केला. यावेळी नगरअभियंता रतन अवसरमल, उपायुक्त संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त छाया मानकर, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान आदी अधिकारी उपस्थित होते.
भविष्यात अशा स्वरूपाच्या घटना घडू नयेत, यासाठी उपवन तलाव परिसरात ठोस उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. उपवन तलाव परिसरात येणाऱ्या पर्यटकांची तसेच स्थानिक नागरिकांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तलावाला संरक्षक जाळी बसविणे, लॅण्डस्केपिंग करणे तसेच पाण्याच्या खोल पातळीबाबत तलाव परिसरात सूचना फलक लावणे तसेच तलावाभोवती सुरक्षारक्षकांची संख्या वाढविणे, असे आदेश महापौर मोरे यांनी यावेळी प्रशासनाला दिले. तसेच तलाव परिसरावर करडी नजर ठेवण्यासाठी या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय आयुक्त जयस्वाल यांनी घेतला आहे. उपवन तलावासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी निधी मंजूर केला असून त्या माध्यमातून या तलावाची सुरक्षा व उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.