19 September 2020

News Flash

पालिकेच्या मोहिमेमुळे रुग्णसंख्येत घट

चाचण्यांच्या प्रमाणात वाढ, करोनाबाधित रुग्णशोध मोहीम तीव्र, विलगीकरणावर भर

चाचण्यांच्या प्रमाणात वाढ, करोनाबाधित रुग्णशोध मोहीम तीव्र, विलगीकरणावर भर

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये १७ दिवसांच्या टाळेबंदीत प्रशासनाने घरोघरी जाऊन करोनाबाधित रुग्णशोध मोहीम आक्रमकपणे राबविल्याचे स्पष्ट होत असून या काळात चाचण्यांची संख्याही दुपटीने वाढविली आहे. वाढत्या चाचण्या, विलगीकरणावर दिलेला भर आणि दररोज मोठय़ा संख्येने सुरू असलेल्या रुग्णशोध मोहिमेचे काही प्रमाणात सकारात्मकmपरिणाम दिसू लागल्याचा प्रशासनाचा दावा असून टाळेबंदीपूर्वी दररोज सरासरी चारशेच्या आसपास असणारा रुग्णांचा आकडा आता २५० ते ३०० पर्यंत स्थिरावू लागला आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही १.२ टक्क्यांनी घटले आहे.

जून महिन्यात केंद्र आणि राज्य शासनाने टाळेबंदी शिथिल केल्यानंतर ठाणे शहरातील सर्वच दुकाने आणि बाजारपेठा खुल्या झाल्या होत्या. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस शहरात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला. शहरात दररोज चारशेहून अधिक रुग्ण आढळून येत होते. टाळेबंदी लागू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे, १ जुलैला शहरात ३६३ रुग्ण आढळून आले होते.

१२ जुलैपर्यंत टाळेबंदीची मुदत होती. या कालावधीत रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने टाळेबंदीची मुदत १९ जुलैपर्यंत वाढविली. या कालावधीत १६ आणि १७ जुलै या दोनच दिवशी रुग्णांचा आकडा चारशेच्या आसपास होता, तर उर्वरित दिवसांमध्ये तो ३२५ ते ३५० इतका होता. रुग्णांच्या आकडय़ांमधील हा चढ-उतार सातत्याने सुरू असला तरी टाळेबंदीच्या काळात आक्रमक रुग्णशोध मोहीम हाती घेत महापालिका प्रशासनाने हा काळ सार्थकी लावल्याचे चित्र आता पुढे येत आहे.

मोहीम अशी राबवली!

’ पालिका प्रशासनाने शहरात १७ दिवसांच्या टाळेबंदीच्या काळात विविध पथकांमार्फत प्रतिबंधित क्षेत्रांत घरोघरी जाऊन करोना रुग्णशोध मोहीम राबविली.

’ या मोहिमेत आतापर्यंत ८ लाख ४३ हजार ३३८ नागरिकांची ताप तपासणी करण्यात आली आहे.

’ ही तपासणी करत असताना प्रत्येक नागरिकाच्या माहितीचे एका विशिष्ट अ‍ॅपद्वारे संकलन केले जात असून ज्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे आढळत आहेत, अशांचे मोठय़ा प्रमाणावर विलगीकरण केले.

’  या रुग्णांच्या चाचण्या सकारात्मक आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवले. टाळेबंदीच्या काळात राबविण्यात आलेल्या मोहिमेत एका रुग्णामागे २८ नागरिकांचे अलगीकरण करण्यात येत आहे.

’ २५ जूनपर्यंत दररोज ८४६ चाचण्या केल्या जात होत्या. त्यात वाढ करून आता दररोज १८०० च्या आसपास चाचण्या करण्यात येत आहेत.

टाळेबंदीच्या काळात प्रतिबंधित क्षेत्रांत रुग्णांचा वेळीच शोध घेऊन त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले. चाचण्यांची संख्या दुपटीने वाढविण्यात आली. आता संशयितांची प्रतिजन चाचण्यांद्वारे तपासणी केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रांत टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात आली. या सर्वामुळेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली आहे.

– डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 1:52 am

Web Title: decline in covid 19 patients due to thane municipal corporation campaign zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus :  भिवंडीतही करोनामुक्तीचा ‘मालेगाव पॅटर्न’
2 जिल्ह्यात अखेर चाचण्यांची संख्या वाढणार
3 स्वतंत्र नगरपालिकेसाठी १२ हजार हरकती
Just Now!
X