करोनाने उद्भभवलेल्या परिस्थितीमुळे मीरा-भाईंदरमधील लहान बाळांना देण्यात येणाऱ्या पोलिओच्या लसीकरणात घसरण झाली असल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे सप्टेंबर महिन्यात ही घसरण तब्बल २८ टक्के असल्यामुळे पालिका प्रशासनाकडून लसीकरणाकरिता जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांची लोकसंख्या १५ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या सुखसुविधेकरिता प्रशासनाकडून आरोग्य तसेच वैद्यकीय उपक्रम राबवण्यात येतात. यातील केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या पोलिओ लसीकरणाचादेखील समावेश आहे. पोलिओचे लसीकरण करण्याकरिता पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील पाच वर्षांखालील लहान बाळांची तसेच नव्याने जन्मलेल्या बाळांची यादी तयार करण्यात येते व त्यानुसार केंद्र शासनामार्फत ठरवण्यात आलेल्या दिवशी या बाळांना पोलिओचे लसीकरण करण्याचे लक्ष ठरवण्यात येते. याकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांसह खासगी दवाखान्याची मदत घेऊन जागोजागी शिबिरे भरवण्यात येतात. तसेच लहान-मोठय़ा गृहसंकुलात दारोदारी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत पोलिओसेदर्भात पडताळणी व जनजागृती केली जाते.

मार्च महिन्याच्या अखेरीस करोना आजारामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी नियम लागू करण्यात आली. करोना आजाराचा संसर्ग झपाटय़ाने होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे राज्य शासनामार्फत टाळेबंदी नियमात शिथिलता आणण्यात आल्यानंतरदेखील विविध क्षेत्रांत अद्यापही गती प्राप्त झालेली नाही. तसेच अनेक रुग्ण हे आपल्या दैनंदिन अथवा मासिक उपचाराकरिता दवाखान्यात भेट देण्यास पाठ फिरवत आहेत. यांचा मुख्य प्रभाव मीरा-भाईंदर शहरातील पोलिओच्या लसीकरणावर झाला आहे. महानगरपालिकेमार्फत २०२० रोजी तीन वेळा पोलिओ लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. या लसीकरणाचा प्रथम टप्पा जानेवारी महिन्यात, दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात आणि तिसरा टप्पा नोव्हेंबर महिन्यात पार पाडण्यात आला. जानेवारी महिन्यात पालिकेमार्फत ९७ हजार २३८ बळाच्या लसीकरणाचे ध्येय निश्चित करण्यात आले. मात्र करोनाची भीती नागरिकांमध्ये असल्यामुळे केवळ ७० हजार ४३६ म्हणजे ७२ टक्के बाळांना लसीकरण करण्यात आले.