25 September 2020

News Flash

येऊरमधील पर्यटक संख्येत घट

निसर्गरम्य आणि शांत असलेल्या येऊर परिसरात प्रभात फेरीसाठी अनेक जण जातात.

 

|| ऋषिकेश मुळे

महिनाभरात सरासरी पर्यटक संख्येत दोनशेची घट; हॉटेल व्यावसायिकांचेही उत्पन्न ४० टक्के कमी :- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वनपरिक्षेत्रात मनुष्यविहारावर नियंत्रण आणण्यासाठी वन विभागाने शुल्कवसुली करण्याबरोबरच रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या महिनाभरापासून सुरू असल्यामुळे येऊर भागातील दोनशे ते अडीचशे पर्यटकांची संख्या रोडावली आहे. शुल्क आकारणीमुळे पर्यटक येऊरकडे पाठ फिरवून त्याऐवजी पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसराला पसंती देत आहेत. पर्यटक घटल्याने येऊर भागातील हॉटेल व्यवसायाच्या उत्पन्नातही ४० टक्क्यांची घट झाल्याचा व्यावसायिकांचा दावा आहे.

निसर्गरम्य आणि शांत असलेल्या येऊर परिसरात प्रभात फेरीसाठी अनेक जण जातात. तसेच येऊर परिसरात फेरफटका मारण्यासाठी दिवसभर नागरिक जात असतात. या परिसरात हॉटेल आणि बंगले आहेत. त्यामुळे सकाळपासून ते रात्रीपर्यंत या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते. या नागरिकांकडून वन्य प्राण्यांना धोका होऊ नये यासाठी वन विभागाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येऊर वनपरिक्षेत्रात प्रवेशासाठी शुल्कवसुली करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या महिनाभरापासून केली जात आहे. एका प्रौढ व्यक्तीसाठी ५८ रुपये, ५ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ३१ रुपये आणि कारसाठी १९५ रुपये शुल्क घेतले जाते. येऊर परिसरात अनेक जण कारमधूनच प्रवास करतात. त्यामुळे नागरिकांना कार तसेच त्यामधील व्यक्तींसाठी तीनशे ते चारशे रुपये शुल्क भरावे लागते.  हा खर्च वाढल्यामुळे अनेकांनी आता येऊरऐवजी पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसराला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरापूर्वी शुल्क आकारले जात नव्हते, त्या वेळेस येऊरला दररोज ५०० ते ६०० पर्यटक येत होते. मात्र गेल्या महिनाभरापासून शुल्क आकारणी लागू झाली असून या काळात पर्यटकांची संख्या दोनशे ते अडीचशेने रोडावली आहे, अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.

पर्यटक येऊरला जाण्याऐवजी उपवन तलाव परिसराला पसंती देत आहेत. त्यामुळे येथील हॉटेल व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. तर पर्यटकांनी पाठ फिरविल्यामुळे येऊरमधील हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. यापूर्वी रात्रीच्या वेळेत येऊरमधील हॉटेल हाऊसफुल असायची. तसेच शनिवारी आणि रविवारी या हॉटेलांमध्ये मोठी गर्दी असायची. मात्र आता रात्रीच्या बंदीमुळे हॉटेलमध्ये ग्राहक नसल्याचे चित्र दिसून येते. या व्यवसायात ४० टक्क्यांनी घट झाल्याचा दावा हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे.

 

वन विभागाची प्रवेश शुल्क अंमलबजावणी यापूर्वी शिथिल होती, मात्र अचानकपणे या प्रवेश शुल्क नियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाऊ लागली आहे. यामुळे ग्राहक वाढीव ३०० ते ४०० रुपये भरण्याऐवजी उपवन तसेच शहरातील इतर हॉटेलांमध्ये जाण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे येऊरमधील हॉटेल व्यवसायाच्या उत्पन्नात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. – नीलेश आरते, हॉटेल व्यावसायिक, ठाणे

 

शासनाच्या अध्यादेशानुसार यापूर्वी हा नियम लागू होता. पर्यटक जंगलातील वन्यप्राणी परिक्षेत्रात प्रवेश करू लागले आणि त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून या अध्यादेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. – राजेंद्र पवार, येऊर वनपरिक्षेत्राचे अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 1:17 am

Web Title: decrease in number of tourists akp 94
Next Stories
1 गुडविन ज्वेलर्सच्या मालकांची ठाण्यातली मालमत्ता पोलिसांकडून जप्त
2 पालघर येथे वाघोबा उत्सव उत्साहात संपन्न
3 ठाण्यातून ‘हमीनस्तू’ महाअंतिम फेरीत
Just Now!
X