लोकहितासाठी हाती घेतलेले प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रकल्प केंद्राचे असो वा राज्य सरकारचे, त्यात भेद करून अडथळे आणता कामा नयेत. एकीकडे अडथळ्यांची शर्यत उभी करायची आणि दुसरीकडे कामाची गतीही मोजायची, हा प्रकार योग्य नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

कल्याण येथील पत्रीपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या अनेक संस्थांकडे राज्याची कामे अडकून पडली आहेत याची आठवणही त्यांनी यावेळी विरोधकांना करून दिली.

पत्रीपूल मार्गी लावण्यासाठी रेल्वे विभागाचे चांगले सहकार्य मिळाले. हा विभाग केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे. केंद्र शासनाच्या अनेक विभागांचे विविध प्रकल्प राज्याच्या अनेक भागांत सुरू आहेत. असे प्रकल्प सुरू असताना तो केंद्र सरकारचा आहे म्हणून राज्य सरकारने अडथळा आणायचा आणि राज्याचा आहे म्हणून केंद्राने अडथळा आणायचा असे होता कामा नये. हे प्रकल्प जनतेच्या हिताचे आहेत, हे प्राधान्याने लक्षात घेतले पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

प्रकल्पात कोठे अडथळे येत असतील तर ते दोन्ही सरकारांनी परस्पर सहकार्याने दूर केले पाहिजेत. असे प्रश्न लोकहिताचा विचार करून मार्गी लागले पाहिजेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. विकास कामे करताना एखाद्याला पायात पाय टाकून रोखून धरायचे. आधी पुढेच जाऊ द्यायचे नाही आणि मग कामे होत नाहीत, रखडली अशी ओरड करायची असले उद्योग बरे नाहीत अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली.

डोंबिवली, कल्याण, शिळफाटा रस्त्यावरील खड्डे, येथील विकास कामांची नेहमी चर्चा, टीका होते. शिळफाटा रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर द्या. रस्ता चार ते १० पदरी करा, येथे मेट्रो आली पाहिजे. विकास कामे झाली पाहिजेत. हे होत असताना अडथळ्यांचे राजकारण होता कामा नये. कामे रखडली म्हणून मला कठोर होण्यास भाग पाडू नका. पत्रीपुलाचे काम पाहता तशी वेळ येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर व्यक्त केला.

दरम्यान, करोनाची लस आली तरी, सर्व काही खुले झाले असे अजिबात वागू नका. करोनाचे पूर्ण उच्चाटन होईपर्यंत सर्व नियम पाळा. राजकीय मंडळींनी सभा, आंदोलने यावर आवार घालावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

नामकरण काय?

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रीपुलाचे ‘आई तिसाई देवी’ नामकरण करीत असल्याची घोषणा केली. आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रीपुलाला भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याची मागणी केली होती. नामकरणाचा विषय सामंजस्याने मिटवू असे पालकमंत्री म्हणाले. कार्यक्रमाला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खा. कपील पाटील, आ. रवींद्र चव्हाण, आ. प्रमोद पाटील, आ. गणपत गायकवाड, आ. विश्वनाथ भोईर, महापौर विनिता राणे, आयुक्त विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी उपस्थित होते.