19 September 2018

News Flash

मुंब्रा बाह्यवळण मार्गाला तडे

१६ जुलैला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता होती.

मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावरील एका मार्गिकेच्या सुमारे ४५ मीटर परिसरात तडे गेले आहेत.

दुरुस्तीचे काम किमान महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता

ठाणे : गेल्या दोन महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या मुंब्रा बावळण मार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत आले असतानाच या मार्गावर तडे गेल्याची बाब मंगळवारी रात्री उघड झाली. आता संपूर्ण रस्त्याची तज्ज्ञांमार्फत तपासणी करून दुरुस्ती करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीला विलंब होणार असून ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ानंतरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

उरण येथील जेएनएनपीटी बंदरातून मुंबई, ठाणे, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून सुरू असते. या मार्गावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याची बाब काही महिन्यांपूर्वी समोर आली. त्यानंतर पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने मे महिन्यात पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दुरुस्तीकामामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून येथील वाहतूक ठाणे, कल्याणमार्गे वळविण्यात आली आहे. या कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले होते. या मुदतीनुसार १६ जुलैला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता होती. मात्र या रस्त्याला नव्याने तडे गेल्यामुळे ही मुदत लांबणीवर पडणार आहे.

HOT DEALS
  • Micromax Vdeo 2 4G
    ₹ 4650 MRP ₹ 5499 -15%
    ₹465 Cashback
  • MICROMAX Q4001 VDEO 1 Grey
    ₹ 4000 MRP ₹ 5499 -27%
    ₹400 Cashback

मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील पथकर नाक्यापासून एक ते दीड किमी अंतरावर तडे गेले आहेत. मुंब्रा-पनवेल मार्गिकेवर ४५ मीटर परिसरात हे तडे गेले आहेत. मुंब्रा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी या वृत्तास दुजोरा दिला. तर पावसाच्या पाण्यामुळे रस्ता खचल्याचे पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता आशा जठाळ यांनी सांगितले.  पुलाच्या दुरुस्तीच्या कालावधीतच तडे केलेल्या भागाची दुरुस्ती केली जाणार आहे. याशिवाय, संपूर्ण रस्त्यांची तज्ज्ञांमार्फत तपासणी करून त्यानुसार आवश्यकेनुसार दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात पूल वाहतुकीसाठी खुला होऊ शकेल, अशी शक्यता जठाळ यांनी व्यक्त केली.

First Published on July 12, 2018 3:15 am

Web Title: deep crack develop in mumbra bypass road