घोडबंदरमधील रस्त्यांवर खड्डे; बेकायदा पार्किंग

ठाणे : महामार्गावरील वाहनांच्या वर्दळीचा शहरातील अंतर्गत वाहतुकीचा ताण पडू नये यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत घोडबंदर येथे तयार करण्यात आलेले सेवा रस्ते केवळ नावापुरते उरले आहेत. कोटय़वधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या सेवा रस्त्यांवर होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे वाहनांना मार्गक्रमण करणे अशक्य होत आहे. त्यातच या मार्गावर झालेल्या खोदकामानंतर खड्डे नीट  बुजवण्यात न आल्याने गेल्या तीन दिवसांच्या पावसात या रस्त्यांची चाळण झाली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दोन्ही बाजूला कापुरबावडी ते गायमुखपर्यंत सेवा रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्यांचा वापर अंतर्गत वाहतुकीऐवजी बेकायदा पार्किंगसाठी होत असल्याची बाब अनेकदा उघड झाली आहे. या बेकायदा पार्किंगविरोधात ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाने काही वर्षांपूर्वी कारवाई सुरू केली होती. या कारवाईनंतर काही महिने बेकायदा पार्किंगला आळा बसला होता. मात्र, कारवाई थांबताच पुन्हा वाहने येथे उभी राहू लागली आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यातच या सेवारस्त्यांची अवस्था दयनीय झाली असल्याने या मार्गावरून ये-जा करणेही वाहनचालक टाळू लागले आहेत.

सेवा रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे दोन ते तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या नव्या कोऱ्या रस्त्यामुळे घोडबंदरवासीयांचा प्रवास सुखकर झाला होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर विविध वाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. या कामांसाठी सेवा रस्ते मधोमध खोदण्यात आले आहेत. वाहिन्या टाकून झाल्यानंतर खोदलेले खड्डे माती टाकून बुजविण्यात आले आहेत. त्यावर खडीचा मुलामाही देण्यात आला असून तो पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे जागोजागी खड्डे पडल्याचे चित्र आहे. या खड्डय़ांमधून दिवसा वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच रात्रीच्या वेळेस अंधारात रस्त्यावरील खड्डे चुकवताना चालकांचे अपघात होण्याची भीती आहे.

मानपाडा येथील सेवा रस्त्यालगत असलेल्या इमारतींमधील सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसून येते. या रस्त्यावरील काही गटारांची झाकणे ही मूळ रस्त्यापेक्षा अधिक उंचीवर आहेत. त्यामुळेही अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. घोडबंदर सेवा रस्त्यावरील धोकादायक झाडांच्या फांद्या महापालिकेने काही दिवसांपूर्वी छाटल्या. छाटणीनंतर फांद्या रस्त्यालगतच ठेवण्यात आल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले.

मुख्य महामार्गावरून या वाहिन्या टाकण्याची परवानगी नसते. या रस्त्यावर विविध वाहिन्या टाकण्याची कामे करण्यात आली. या खोदकामामुळे हे खड्डे निर्माण झाले आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल.

– अनिल पाटील, शहर अभियंता