ऋषीकेश मुळे

शाळांतील उपलब्ध जागांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत ३ हजार १९४ने कमी

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील बालकांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी शासनाकडून जागृतीपर उपक्रम राबवण्यात येत असताना दुसरीकडे येत्या शैक्षणिक वर्षांसाठी आरटीईच्या जागांत गतवर्षीच्या तुलनेत ३ हजार १९४ जागा कमी करण्यात आल्या आहेत. उपलब्ध जागांच्या संख्येपेक्षा अर्जाची संख्या दोन हजारांनी अधिक असल्यामुळे प्रवेशाचा गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आगामी शैक्षणिक वर्षांसाठी आरटीईअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत नुकतीच संपली. २०१८-१९ या गेल्या शैक्षणिक वर्षांसाठी ठाणे जिह्य़ात ६४० शाळांमध्ये आरटीई प्रवेशाच्या १६ हजार ५९४ जागा होत्या. १३ हजार १७० पालकांनी अर्ज केला होता. त्यापैकी फक्त ५ हजार ७०८ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला. गेल्या वर्षी आरटीई प्रवेशाच्या १०० टक्के जागा भरल्या गेल्या नाहीत. यंदा मात्र ठाणे जिह्य़ातील नियोजित जागाच शासनाने कमी केल्या आहेत. २०१९-२० या शैक्षणिक वर्षांसाठी ठाणे जिल्ह्य़ातील ६५२ शाळांसाठी १३ हजार ४०० जागांचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षांपेक्षा हे प्रमाण ३ हजार १९४ ने कमी झाल्याचे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पालकांमध्ये नाराजी आहे.

गेल्या वर्षी निम्म्या अर्जदारांनाच प्रवेश देण्यात आला त्यामुळे नियोजित जागाही कमी आणि प्रवेशही कमी दिसे जात असतील, तर हक्काचे शिक्षण घ्यायचे तरी कसे असा प्रश्न आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील पालकांना पडला आहे.

सामाजिक संस्थेकडून जनजागृती

गेल्या काही वर्षांपासून ठाण्यातील ‘तपस्या प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेतर्फे आरटीईअंतर्गत प्रवेश कसा दिला जातो या विषयी राज्यभर जनजागृती करण्यात येत आहे. गावपाडय़ांवर, झोपडपट्टी भागांमध्ये जाऊन शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. प्रवेश प्रक्रियेची इत्थंभूत माहिती देण्यात येते. संपर्क- ०२२३३४९४३३३

ठाणे जिल्ह्य़ातील शिक्षण हक्क कायद्याच्या जागा का कमी झाल्या आहेत याचा अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर माहिती दिली जाईल.

– संगीता भागवत, शिक्षणाधिकारी, ठाणे जिल्हा परिषद, प्राथमिक विभाग

मोबाइल अ‍ॅपद्वारे अर्जात वाढ

अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी गतवर्षांपासून मोबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र ठाणे जिल्ह्य़ात २०१८-१९ मध्ये केवळ चारच अर्ज मोबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे आले होते. यंदा १६ हजार २५९ अर्ज ऑनलाइन आले त्यापैकी ६६ अर्ज मोबाईल अ‍ॅपद्वारे आल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

शाळांमध्ये वाढ

अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची आरटीईअंतर्गत निवड झाल्यास त्याला राहत्या घरापासून तीन किलोमीटरच्या आतील शाळेतच प्रवेश दिला जातो. यंदा ठाणे जिल्ह्य़ातील आरटीईअंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ६४० शाळांमध्ये प्रवेश देण्यात आले होते. यंदा ६५२ शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. १२ शाळांची वाढल्याने थोडा दिलासा मिळाल्याचे काही पालकांकडून सांगण्यात आले आहे.