मीरा-भाईंदरच्या महापौरांचाच गौप्यस्फोट; कंत्राटदारांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

मीरा-भाईंदर महापालिकेतर्फे गटारांवर लावण्यात येणारी झाकणे अतिशय निकृष्ट दर्जाची असून, केवळ एक वर्षांच्या अवधीत ती तुटत असल्याचे उघड झाले आहे. खुद्द महापौर गीता जैन यांनी हे प्रकरण उजेडात आणले आहे. गटारावरील निकृष्ट दर्जाच्या झाकणांमुळे ऐन पावसाळ्यात जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत असून, यामुळे महापालिकेच्या कंत्राटदाराकडून होत असलेल्या विकासकामांच्या दर्जापुढे पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शहरातील नालेसफाईचे काम सध्या सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी महापौर गीता जैन सध्या विविध ठिकाणी भेट देत आहेत. भाईंदर पश्चिम येथील ६० फुटी परिसरातल्या रेल्वे समांतर नाल्याची पाहणी करण्यासाठी त्या गेल्या असता तेथील गटारांच्या सीमेंट काँक्रीटच्या झाकणांची अवस्था अतिशय दयनीय असल्याचे दिसून आले.

गेल्या वर्षी म्हणजेच २०१५ मध्येच ही झाकणे बसविण्यात आल्याचे झाकणांवर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र ही झाकणे केवळ हात लावताच तुटून पडत असल्याचे महापौरांनी सांगितले. ऐन पावसाळ्यात शहरातील अनेक भाग पाण्याखाली जात असतात. अशा वेळी रस्तेच नव्हे तर गटारेही पाण्याखाली जातात. त्यामुळे कोणत्याही नागरिकाचा पाय चुकून अशा  निकृष्ट दर्जाच्या झाकणावर पडला तर जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.

या पाश्र्वभूमीवर गटारावर निकृष्ट दर्जाची झाकणे बसविण्याचा प्रकार गंभीर असून, नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया खुद्द महापौरांनीच व्यक्त केली आहे.

आयुक्तांकडून काय कारवाई?

गटारावर झाकणे नसल्याने उघडय़ा गटारात पडून लहान मुलांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील गटारांच्या झाकणांची देखभाल करण्याची जबाबदारी आयुक्तांनी प्रभाग अधिकारी तसेच आरोग्य निरीक्षकांवर दिली आहे. गटारांची साफसफाई करताना झाकणे तुटल्यास अथवा गटारांवर झाकणेच नसल्यास त्याचा दैनंदिन अहवाल देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. परंतु एकाही प्रभाग अधिकारी अथवा आरोग्य निरीक्षकांनी हे आदेश गांभीर्याने घेतलेले नाहीत. आता खुद्द महापौरांनी निकृष्ट दर्जाच्या गटारांच्या झाकणांचे प्रकरण उजेडात आणल्यानंतर आयुक्त काय कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.