सदस्यांकडून देखभाल शुल्क देण्यात असमर्थता; अवाजवी वीजबिल, विशेष उपाययोजनांमुळे खर्चात भर

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : करोनाच्या संकटात  छोटय़ा आणि मध्यम स्वरूपाच्या गृहसंकुलांचेही आर्थिक गणित बिघडू लागले आहे. स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि इतर विशेष उपाययोजनांसाठीचा खर्च वाढला असताना अनेक सदस्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने सदस्यांकडून मासिक देखभाल दुरुस्ती खर्च देण्यात दिरंगाई होताना दिसते आहे. त्यात नव्याने आलेल्या वीज बिलांची त्यात भर पडल्याने गृहसंकुलांना खर्चाचे गणित सांभाळताना कसरत करावी लागते आहे.

सुरुवातीच्या काळात अनावश्यक लोकांचा वावर टाळण्यासाठी अनेक लहान, मध्यम गृहसंकुलांनी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली होती. संकुलांबाबत अद्याप ठोस नवी नियमावली आली नसल्याने सुरक्षा कवच काढायचे की नाही याबाबत सोसायटी समितीचे पदाधिकारी संभ्रमात आहेत. पाचव्या टप्प्यातल्या टाळेबंदीत शिथिलता आल्याने नागरिकांचा घराबाहेर ये-जा करण्याचे प्रमाण वाढले आहे. घराबाहेर जाणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि इतर सदस्यांचा वावर आता वाढल्याने निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर यंत्र, सफाई कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने दररोज द्यावी लागत आहेत. सोसायटी सातत्याने निर्जंतुकीकरण करावी लागत असल्याने त्याचाही खर्च वाढला आहे. हा नव्याने खर्च वाढत असताना अशा गृहसंकुलांचे उत्पन्न मात्र घटल्याचे दिसून आले आहे. अनेक लहान, मध्यम गृहसंकुलांमधील रहिवाशांचे उत्पन्न घटल्याने त्यांनी गृहसंकुलांचा मासिक देखभाल दुरुस्तीचा खर्च देण्याच हात आखडता घेतला आहे. याबाबत सोसायटी समितीकडून सातत्याने तगादा लावला जातो आहे. करोनाच्या काळात नोकरीवर आलेली गदा, घटलेले उत्पन्न यामुळे इतर कारवाई केली जात नाही. त्याचा परिणाम गृहसंकुलांच्या उत्पनावर झाला आहे. त्यात जून महिन्यात आलेल्या विज बिलांची रक्कम लाखोंच्या घरात गेली आहे. आधीच घटलेले उत्पन्न आणि त्यात लाखो रुपयांची आलेली बिले यामुळे गृहसंकुलांचे आर्थिक गणित सांभाळताना गृहसंकुलातील समिती सदस्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.

आमची सोसायटी लहान आहे. येथे राहाणारे बहुतांश नागरिक हे चाकरमानी आहेत. टाळेबंदीच्या काळात त्यापैकी अनेकांचे वेतन कापले गेले असून काहींना पगारही मिळालेला नाही. त्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी आग्रह धरताना जड जाते. त्यामुळे बिले आणि सफाई कामगारांचे पगार द्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

– नीलेश सावंत, कृष्णा रेसिडेन्सी, बदलापूर

स्वच्छता आणि साफसफाईसाठीचा खर्च वाढला आहे. त्यात पावसाळापूर्वीची तयारी आणि वाढीव वीज बिल यामुळे आर्थिक गणित बिघडले आहे.

– देवेंद्र जाधव, अध्यक्ष, ट्रोगन हिल सोसायटी, बदलापूर.